विजेच्या लपंडावाने नागरिक घामाघूम
--------------------------------
सटाण्यात पारा बेचाळीस अंशाच्या पुढे
सकाळ वृत्तसेवा
सटाणा ता.१४ : सटाणा शहर आणि परिसरात सध्याच्या मे महिन्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. कडक उन्हाच्या उष्णतेच्या झळांनी संपूर्ण शहर होरपळून निघत असतानाच, महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा प्रचंड लपंडाव सुरू आहे. या अघोषित भारनियमनामुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले असून, व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाला सुद्धा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सध्या सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागतात. रस्ते ओस पडत असून नागरिक उन्हापासून बचावासाठी घरात थांबणे पसंत करत आहेत. मात्र, अचानक वीज गायब होत असल्याने घरांचे रूपांतर जणू ''भट्टी''त झाले आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे विजेअभावी प्रचंड हाल होत आहेत. पंखे आणि कुलर शोभेच्या वस्तू बनल्याने नागरिकांना घामाच्या धारांमध्येच दिवस काढावा लागत आहे. उन्हाळ्यात मोठ्या व्यवसायाची अपेक्षा असणाऱ्या हॉटेल, ज्यूस सेंटर, लस्सी आणि शीतपेय विक्रेत्यांना या वीज संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वीज वारंवार खंडित होत असल्याने फ्रीज आणि डीप-फ्रीझर बंद पडत आहेत. परिणामी आईस्क्रीम, दुग्धजन्य पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स खराब होत असून व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी काहींना महागडे जनरेटर किंवा इन्व्हर्टर वापरावे लागत आहेत, ज्यामुळे इंधनाचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
झोपही उडाली
विजेचा हा खेळ केवळ दिवसापुरता मर्यादित नसून रात्रीच्या वेळीही वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांची रात्रीची झोप मोड होत आहे. एकीकडे प्रचंड उष्णता आणि दुसरीकडे महावितरणचा मनमानी कारभार, अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन सटाणा शहरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी आहे.
कोट
नागरिक आधीच उष्णतेने त्रस्त झाले आहेत. त्यात महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना न देता अघोषित भारनियमन सुरू केले आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सर्वांचे अतोनात हाल होत आहेत. महावितरणने हा विजेचा खेळ खंडोबा त्वरित थांबवून वीजपुरवठा सुरळीत करावा. तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– राहुल पाटील, शिवसेना गटनेते, सटाणा नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.