आदिवासी गावे, पाड्यांसाठी
साडेबारा कोटींच्या पाणी योजना
पालकमंत्री पाटील : ७० दुर्गम ठिकाणी सौरऊर्जेचा आधार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : आदिवासी समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा पोहोचविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासकामांना निधी दिला जात आहे. जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी पाडे- वस्त्यांवरील उर्वरित पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेबारा कोटींचा निधी उपलब्ध करून या योजना राबविणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंती, ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी अरुण पवार, सह प्रकल्पाधिकारी प्रवीण दाभाडे आदी उपस्थित होते.
रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील सुमारे ७० आदिवासी गावे व पाड्यांमध्ये सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीतून निधी देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
चौकट
कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले, की भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अतिदुर्गम गावे व पाड्यांमध्ये अद्याप वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.