उमरेड : येथील नगर परिषदेच्या आ.ला. वाघमारे शाळेतील चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे पत्रकार भवनातील कक्षात वर्ग घेतले जात आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. आम्हाला शाळेतील वर्गाच बसू द्या, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.
परसोडी परिसरात नगर परिषदेची आ.ला. वाघमारे ही शाळा असून शाळेत ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र, या शाळेत विद्यार्थ्यांसाठी बसायला सोय नाही. दोन पाळीत वर्ग घेण्यात येत असून फक्त सात वर्गखोल्या आहेत.
त्यामुळे चौथीतील ड वर्गातील विद्यार्थ्यांना नगर परिषदेच्या पत्रकार भवनातील कक्षात वर्ग घेतले जात आहे. तिथे शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमत नाही. हा प्रकार पालकांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापिका ममता लिखार यांना निवेदन दिले.
तसेच विद्यार्थ्यांना शाळा परिसरात वर्गखोली उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत सोमवारी "आ. ला. वाघमारे शाळेत विद्यार्थी ६५० ,वर्गखोल्या केवळ सात" या शीर्षकाखाली सकाळने वृत्त प्रकाशित केले. यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले.
झालेला प्रकार पाहण्यासाठी पत्रकार भवनाच प्रत्यक्ष भेट दिली असता विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी वर्ग चौथी (ड) चे एकूण ४२ विद्यार्थी आहेत. यात २८ मुले व १४ मुलींचा समावेश आहे.
वर्गशिक्षिका रेखा रेवतकर यांचे उपस्थितीत राष्ट्रगीत व प्रार्थना म्हणताना आढळून आले. यासंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता येथे शैक्षणिक वातावरण नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला आमच्या शाळेतच बसू द्या, अशी विनंती केली.
यावेळी अंश मुळे, सुशील श्रीरामे, पलक गेडाम, आरोही चौधरी, जीविका जिभकाटे,इशानी शिंगाडे व तन्मय वाघमारे विद्यार्थ्यांनी आम्हाला आमच्या शाळेत बसून शिकायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली.
शाळेच्या व पत्रकार भवनाच्या दरम्यान सिमेंट रस्ता येत असून त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळेच्या मुख्य इमारतीत ४० -४२ विद्यार्थ्यांना रोज प्रार्थनेसाठी ने आण करणे जोखमीचे आहे. जर विद्यार्थ्यास अपघात झाला,दुखापत झाली तर त्याची जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न उपस्थित करून सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत व प्रार्थना या पत्रकार भवनातच घेण्यात येते, असेही सांगण्यात आले.
स्वच्छतागृहात दुर्गंधी
पत्रकार भवनातील स्वछता गृहात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. सतत दुर्गंधी येत असते.त्यामुळे याठिकाणी विद्यार्थ्यांना शिकविणे अवघड होत आहे. विशेष म्हणजे शाळेतील एका वर्गखोलीत विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली असून त्याचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांना होत नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
शाळेतील विज्ञान प्रयोगशाळा अन्यत्र स्थलांतरित करून चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसू देण्याचे पत्र आले की आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.
- अर्चना मेंढे, मुख्याधिकारी, नगर परिषद उमरेड
शाळेत कोरोना काळात एका वर्गखोलीत विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्यात असलेले साहित्य, उपकरणे हे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना अंशतः उपयोगी पडणारे आहेत. बाकीचे जास्तीत जास्त मोठ्या विद्यार्थ्यांना उपयोगात येईल असे आहे म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांना प्रयोगशाळा अन्य ठिकाणी हलवून विनंती केली आहे. याबाबत विनंती पत्र सादर केले आहे.
- ममता लिखार,प्रभारी मुख्याध्यापिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.