वाशीम : जैनांची काशी म्हणून ख्यात असलेल्या शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरातील मूर्तीच्या पुजेवरुन गेल्या शंभर वर्षांपासून श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथामध्ये वाद सुरु आहे़. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल ४५ वर्षानंतर मंदिर खुले झाले मात्र, दोन्ही पंथीयांमध्ये हिंसक घटना घडत आहेत. याबाबत प्रशासन न्याय भुमिका घेत नसल्याच्या निषेधात आज २८ जून रोजी राज्यभरातील हजारो दिगंबर जैन बांधवांच्या सहभागातील विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताचे मंदिर असून, येथील मंदिराबाबत जैन धर्मातील श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथीयांमध्ये वाद आहे. मंदिरातील मुळ मूर्ती असलेल्या पार्श्वनाथाच्या मूर्तीवर दोन्ही पंथीयांकडून दावा केला जातो. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता दरम्यान, मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पंथीयांना ठराविक वेळेत पुजेचा अधिकार देवून या वादावर तोडगा काढला होता. तब्बल ४५ वर्षानंतर पार्श्वनाथाचे मंदिर खुले झाले मात्र, पुजाविधीच्या वेळापत्रकात दोन्ही पंथीयामध्ये समन्वय साधल्या गेला नसल्याने त्याठिकाणी कोणत्या न कोणत्या कारणावरून अनेकदा मारहाणीच्या घटना घडत आहेत.
त्यातच पोलिस प्रशासन कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी वारंवार दबाव निर्माण होत आहे. या कारणामुळे दिगंबर समाजाच्यावतीने शुक्रवारी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये संपूर्ण राज्यातून दिगंबरी जैन समाजाच्या महिला व पुरुषांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. सदर मोर्चा बालाजी मंदिर जय स्तंभ येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासन, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी अधिक माहिती देताना सिद्धांतसागर महाराज व ब्रह्मचारी तात्या यांनी इतिहासाचे उदाहरण देत अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरामधील जो विवाद सध्या सुरू आहे तो फक्त अंतरिक्ष पार्श्वनाथ मूर्तीपुरता मर्यादित असून उर्वरित १५ दिगंबरी मूर्ती आणि वेदी यावर कोणताही वाद नाही. मात्र पूजेसंबंधीचे वेळापत्रक फक्त अंतरिक्ष पार्श्वनाथ मूतीर्बाबत मर्यादित असूनही काही असामाजिक तत्त्व क्षेत्रपालच्या मूर्तीवर ताबा करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. त्यामध्ये पोलिस प्रशासन देखील पुजाऱ्यांवर दबाव निर्माण करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.
या मोर्चानंतर मुनी सिध्दांतसागरजी महाराज यांच्यासह दिगंबर जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये शिरपूर येथे दिगंबरी समाजावर पोलिसांचा दबाव नाहीसा करावा. तसेच मंदिरातील वेदीवरील मूर्ती मुळ दिगंबरी स्वरुपात असल्याने श्वेतांबरी समाजाकडून त्या बदलण्यात येत आहेत. याला अटकाव करावा सोबतच श्वेतांबरी समाजाने मंदिरात तैनात केलेले शस्त्रधारी माणसे हटवावित इत्यादी मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात राज्यभरातील जैन बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तब्बल चार किमी मोर्चेकऱ्यांची रांग होती. हातात जैन ध्वज व मागण्यांचे फलक घेतलेल्या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी संपूर्ण वाशीम शहर दणाणून गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.