Sakal-Exclusive
Sakal-Exclusive 
विदर्भ

‘सिक्‍स पॅक’ने लोळवली मातीतील ‘दंगल’

नरेंद्र चोरे

नागपूर - एकेकाळी आखाड्यांचे शहर म्हणून गणल्या गेलेल्या उपराजधानीतील मोहल्यामोहल्यांमध्ये कुस्तीचे आखाडे अन्‌ व्यायामशाळा दिसायच्या. मात्र, काळाच्या ओघात ही परंपरा संपुष्टात आली असून, आखाड्यांची जागी आता ‘पॉश’ जिम व ‘फिटनेस क्‍लब’ने घेतली आहे. राजकारण, पदाधिकाऱ्यांमधील भांडणे, तरुणांची उदासीनता, स्पर्धा व राजाश्रयाच्या अभावामुळे या देशी खेळाला घरघर लागली आहे. केवळ नागपूर शहरातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातच कुस्तीला राजकारणाची कीड लागल्याचे निराशाजनक चित्र दिसून येते. 

ऐंशी व नव्वदच्या दशकात शहरातील महाल, सीताबर्डी, इतवारी, गांजाखेत, हंसापुरी, सतरंजीपुरा, तांडापेठ, सिरसपेठ, धंतोली, रेशीमबाग, सदर, पाचपावली, पारडी या भागांमध्ये लाल मातीचे असंख्य आखाडे होते. या ठिकाणी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तरुणांची गर्दी दिसायची.

कुस्तीसोबतच भारतीय संस्कृती जपण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र कुस्तीचे आखाडे बनले होते. केवळ शहरातच नव्हे, ग्रामीण भागातही ‘सिक्‍स पॅक’ने लोळवली मातीतील ‘दंगल’ मोठ्या प्रमाणावर आखाडे होते. धंतोलीच्या यशवंत स्टेडियम व महालमधील चिटणीस पार्कवर कुस्तीच्या वर्षभर नियमित स्पर्धा व्हायच्या. गावखेड्यांमध्येही दंगलींचे आयोजन होत. मात्र, काळाच्या ओघात आखाडे बंद पडले. जे काही मोजके आखाडे शिल्लक आहेत, ते खुराडे बनले आहेत. मुळात तरुणाईमध्ये कुस्तीबद्दलची क्रेझ कमी झाली आहे. ना आखाडे, ना स्पर्धा, ना करिअर किंवा ‘जॉब’ मिळण्याची गॅरंटी. त्यामुळे ऑलिम्पिक खेळ असूनही केवळ ‘मोटिव्हेशन’ व अनुकूल वातावरण नसल्यामुळे कुस्तीमध्ये करिअर करावे, असे तरुणांनाही वाटत नाही. केवळ ‘सिक्‍स पॅक्‍स’ आणि पिळदार दंड व शरीर बनविण्याकडेच सद्य:स्थितीत तरुणाईचा अधिक कल दिसून येतो. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर कसातरी हा खेळ तग धरून आहे. 

जुन्या काळात कुस्तीवर जिवापाड प्रेम करणारे पहेलवान होते. शौक पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असायची. विदर्भकेसरी किताब विजेते रामदास तडस, गणेश कोहळे, हरिहर भवाळकर, सुधाकर गुरव, देवराव गायधने व दिलीप इटनकरसारख्या नावाजलेल्या पहेलवानांनी देशभरातील कुस्त्या गाजवून आपल्यातील ‘टॅलेंट’ दाखवून दिले. त्यांनी बक्षिसे जिंकून नागपूर व विदर्भाच्या शिरपेचात वेळोवेळी मानाचा तुरा खोवला. दुर्दैवाने वैदर्भींचा ऊर भरून यावा, असे चित्र अलीकडच्या काळात विदर्भात कुठेही पाहायला मिळत नाही.   

वाताहतीसाठी पदाधिकारी जबाबदार 
या देशी खेळाची वाताहत होण्यासाठी मुख्यत्वे पदाधिकारीच कारणीभूत आहेत. कुस्ती वाढविण्याऐवजी ते राजकारणच करीत आले आहेत. सत्तेसाठी एकमेकांचे पाय खेचत आहेत. ऊठसूट कोर्टात जात आहेत. सद्य:स्थितीत नागपूर नगर आखाडा संघटन समिती व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड भांडणे व हेवेदावे आहेत. याचा फटका कुस्तीला बसतो आहे. कुणीही या खेळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही. जुने लोक भांडणात व्यस्त आहेत. तरुणाईला या देशी खेळात रस नाही. शहरातील सध्याचे दूषित वातावरण लक्षात घेता, कुस्तीला अखेरची घरघर लागली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरुणांच्या बदललेल्या आवडीनिवडी, हेही या कुस्तीला अवकळा येण्यामागचे आणखी एक कारण म्हणता येईल. कुस्ती खेळण्यापेक्षा स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याकडेच सध्या तरुणांचा अधिकाधिक कल दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT