File photo
File photo 
विदर्भ

वेटरच्या मुलीला घ्यायचीय आंतरराष्ट्रीय भरारी

नरेंद्र चोरे

नागपूर - ध्येय असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर, कोणतीही परिस्थिती तुमच्या मार्गात आडकाठी बनू शकत नाही. वेटरची मुलगी असलेली राष्ट्रीय धावपटू निकिता राऊत हिने ते सिद्ध करून दाखविले. निकिताने विपरीत परिस्थितीवर मात करीत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतलीय. निकिताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असून, स्वप्नपूर्तीसाठी ती जिद्दीने सराव करीत आहे.

खेळाची आवड असलेल्या निकिताने भगवती गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत असताना "रनिंग'ला सुरुवात केली. काही दिवस नियमित सराव केल्यानंतर थोडे दुर्लक्ष झाले. पण अंतर्मन तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिने पुन्हा मैदान गाठले. ऍथलेटिक्‍समध्ये यशस्वी व्हायचे असेल तर गुरूविना मार्ग नाही, हे समजल्यानंतर 2015 मध्ये राष्ट्रीय धावपटू रवींद्र टोंग यांच्या तालमीत निकिताचा रेशीमबाग मैदानावर खडतर प्रवास सुरू झाला. येथील गोट्या-मातीच्या खडबडीत ट्रॅकवर अक्षरश: चिखल तुडवत ती आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत सकाळ-संध्याकाळ सराव करते.

"आंतरविद्यापीठ ब्रॉंझ' मोठी कमाई
हुडकेश्‍वर येथील चक्रपाणी कला महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या निकिताने अल्पावधीतच आपल्यातील "टॅलेंट' दाखवून दिले. सबज्युनियर, ज्युनियर व सिनियर पातळीवरील जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धा गाजवीत तिने राष्ट्रीय स्पर्धेतही आपला ठसा उमटविला. रोहिणी व मोनिका या राऊत भगिनींच्या कामगिरीपासून प्रेरणा घेत निकिताने आतापर्यंत पाच हजार, दहा हजार मीटर, 21 किमीसह क्रॉसकंट्री शर्यतींमध्ये अनेक पदके मिळविली. पण डिसेंबर 2017 मध्ये गुंटूर येथील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत जिंकलेल्या ब्रॉंझपदकाला ती आयुष्याची सर्वांत मोठी कमाई मानते. निकिताचे ध्येय राष्ट्रीय स्पर्धांपुरते मर्यादित नाही. तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यायची आहे, देशाला पदक मिळवून द्यायचे आहे.

परिस्थितीची जाणीव
20 वर्षीय निकिताच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची आहे. वाठोडासारख्या मागासलेल्या वस्तीत छोट्याशा "वन रूम किचन' घरात ती आपल्या आईवडिलांसोबत राहते. निकिताचे वडील विजय राऊत हे इतवारीतील एका लॉजमध्ये वेटर म्हणून काम करतात, तर आई कल्पना गृहिणी आहे. उशिरा रात्रीपर्यंत काम केल्यानंतर वडिलांना महिन्याकाठी जेमतेम पाच हजार मिळतात. तेवढ्या पैशात घर चालविताना त्रास होत नसल्यामुळे भावालाही शिक्षण सोडून खासगी नोकरी धरावी लागली. निकिताला आईवडिलांच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे खेळाच्या बळावर "जॉब' मिळवून आईवडिलांना हातभार लावायचा आहे.

चिखलात सराव
शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक असला तरी, पूर्व व दक्षिण नागपुरातील धावपटूंसाठी तो सोयीचा नाही. या परिसरातील बहुतांश धावपटू रेशीमबाग मैदानावर सराव करतात. येथील ट्रॅकची सध्याची अवस्था खूपच खराब आहे. जागोजागी खड्डे व गोटे-माती आहे. पावसाळ्यात तर धावपटूंना अक्षरश: चिखल तुडवत सराव करावा लागतो. निकितानेही या समस्येवर बोट ठेवले. ट्रॅकशिवाय आहार (डायट) ही आणखी एक समस्या तिने बोलून दाखविली. धावपटूंना "स्टॅमिना' टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक व सकस आहार घेणे आवश्‍यक असते. दोनवेळ खाण्याचे वांधे असताना निकितासारख्या खेळाडूला सकस आहाराची कल्पनाच करवत नाही. तरीही बक्षिसाच्या रकमेतील थोडाफार पैसा वाचवून ती "डायट'वर खर्च करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT