विदर्भ

दिव्यांग छगनच्या वेदना बघणारे सुपर  

केवल जीवनतारे

नागपूर - छगन सुरेश वाकोडे. मूळचा यवतमाळचा. चौथीत शिकतो. जन्मापासून व्हीलचेअरवरचे आयुष्य जगत आहे. अचानक किडनीचा आजार जडला आणि कुटुंबाच्या आयुष्याचे गणितच बदलले. धुणीभांडी करणारी आई अर्चना छगनला उपचार मिळतील, या आशेवर सुपरच्या व्हरांड्यात प्रतीक्षा करीत आहे. किडनीत होणाऱ्या वेदनांनी छगन  विव्हळतो. लेकराच्या वेदना बघवत नसल्याने ती सुपरच्या डॉक्‍टरांचा देवासारखा धावा करीत आहे. डोळ्यांतून घळाघळा अश्रुधारा वाहत आहेत. परंतु, डॉक्‍टरांना त्या मातेच्या अश्रूंची किंमत नाही. त्याच्या वेदना बघून सुपरच्या किडनी विभागातील एकाही डॉक्‍टरची माणुसकी जिवंत झाली नाही. ‘छगनला भरती करून घ्या’, अशी विनवणी करणाऱ्या त्या मातेचे हात डॉक्‍टरांच्या पायांजवळ गेले; परंतु सारेच प्रयत्न व्यर्थ.  

छगनच्या किडनीत दुखू लागल्याने मे महिन्यात उपचारासाठी मेडिकलमध्ये आणले. किडनीतून पाणी काढले. पहिली वेळ असल्याने सारे कुटुंबच आले होते. दारिद्य्रात आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्‍न उभा ठाकल्याने वडिलांनी लहान 

मुलाला सोबत घेऊन यवतमाळ गाठले. आपल्या काळजाच्या तुकड्यावर उपचारासाठी मे महिन्यापासून कधी मेडिकल, तर कधी सुपर अशी भटकंती ती माता करीत आहे. मुलाच्या उपचारासाठी तिचा संघर्ष सुरू आहे. पंधरा दिवस भरती असताना मिळेल ते काम करून कमावलेल्या पैशातून ती उदरनिर्वाह करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही व्यथा साऱ्यांनाच ठाऊक आहे; परंतु कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही. मेडिकलमधील उपचार संपले, असे डॉक्‍टरांनी सांगत सुपर स्पेशालिटीत पुढील उपचारासाठी रेफर केले. आठ दिवसांपासून सुपरमध्ये किडनी विभागात भरती करून घेतले नाही. जन्मत: अपंग असल्याने छगनवर लहानपणापासूनच उपचार सुरू आहेत. दोन वर्षांचा असताना शस्त्रक्रिया केली. पाठीवरही नुकतीच शस्त्रक्रिया झाली. एक पाय लहान आहे. यावरही शस्त्रक्रिया झाली आहे. गरिबीत आयुष्य जगतानाही आपल्या लेकराला पावलोपावली आधार देत त्या मातेचा संघर्ष कायम सुरू आहे. त्या मातेची व्यथा ऐकून तिला सलाम करण्यासाठी आपोआपच हात वर गेले.

शंभर रुपये रोज कोठून आणू जी? 
मेडिकलमधून सुटी दिल्यानंतर सुपरमध्ये आली. सुपरमध्ये भरती करून घेतले नाही. नागपुरात कोणाचाही आधार नाही. छगनच्या वडिलांचे पंक्‍चरचे दुकान आहे. तीन दिवस लेकराले घेऊन धर्मशाळेत राहिली. परंतु, दररोज १०० रुपये आणू कोठून? ही व्यथा बोलून दाखवताना त्या मातेच्या चेहऱ्यावर आलेली दुःखाची किनार बघवली नाही. यापूर्वी डॉ. धनंजय सेलूकर यांच्यासारखा देवमाणूस धावून आला होता. ते उद्या येतील, माह्या छगनवर उपचार करतील, या आशेवर असल्याचे सांगताना त्या मातेचे डोळे भरून आले.

मायलेकराचा निवारा आकाशाखाली 
येथील एका देवमाणसाने ओपीडीतील व्हीलचेअर दिली. परंतु, सुरक्षारक्षक रात्री व्हरांड्यात राहू देत नाही. यामुळे सुपरच्या परिसरात मोकळ्या आकाशाखाली या उपेक्षित मायलेकराचा निवारा आहे. राजीव गांधी जीवनदायीतून छगनवर उपचार होणार आहेत. मात्र, छगनला भरती करून न घेतल्यामुळे रात्र उघड्यावर काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वॉर्डात भरती केले असते तर लेकराच्या खाटेजवळ या मातेलाही आधार मिळाला असता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT