केळवद (जि. नागपूर) : मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना सोयीचे व्हावे, यासाठी किमान स्मशानभूमीत मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक गावातील स्मशानभूमीला मुबलक निधी दिला जातो. मात्र, केळवद ग्रामपंचायत (kelwad grampanchayat) या निधीपासून वंचित आहे का, असा प्रश्न येथील स्मशानभूमी (cemetery) पाहिल्यावर पडतो. रस्ते, पाणी आणि विजेसारख्या मूलभूत सुविधा येथे नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. निदान आवश्यक सुविधा तरी पुरावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. (kelwad villagers facing problems not having cemetery in nagpur)
सावनेर तालुक्यातील केळवद महत्त्वाचे आणि मोठे गाव. येथील लोकसंख्या पंधरा हजारांच्या घरात आहे. येथे हिंदू धर्माच्या दोन स्मशानभूमी आहेत. यापैकी कपिलेश्वर स्मशानभूमीत सर्व सुविधा आहेत. परंतु, नागपूर-छिंदवाडा महामार्गावरील बसस्थानक परिसरातील स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रासलेली आहे. या स्मशानभूमीत गावातील पाच वॉर्डांपैकी तीन वॉर्ड परिसरातील मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. परंतु, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी एकमेव शेड आहे. त्याभोवती गवत आणि काट्यांचे साम्राज्य आहे. येथे पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. मृतदेह नेण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही. विजेची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अडचणी येतात. नागरिकांना थांबण्याची सोय नसल्याने भर पावसात, उन्हात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला जीव मुठीत घेऊन त्यांना उभे राहावे लागते.
कोरोना काळात प्रचंड त्रास
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी मृत्युसंख्या वाढलेली असताना रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागला. कोरोना नियमांचे पालन करीत अत्यंत कठीण परिस्थितीत नातेवाइकांना अंत्यविधी पार पाडावे लागले. या समस्येवर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने, अजून किती वर्षे मरणानंतरही वेदना सहन करायच्या, असा प्रश्न विचारला जात आहे.
राजकारणी मते मागण्यासाठीच का? केळवद महामार्गालगत असलेले मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. गावातील अर्ध्या परिसरातील मृतांवर याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, येथे साप, विंचू, वन्यप्राण्यांची भीती असते. मृताच्या नातेवाइकांना बसण्यासाठी कुठलीही सोय नाही. राजकारणी केवळ मते मागण्यासाठीच आहेत का?-कुमार खराबे, स्थानिक रहिवासी
महामार्गालगत असल्याने अडचण येथील स्मशानभूमी राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने तसेच काही तांत्रिक कारणांमुळे स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण अथवा इतर कामे करण्यास अडचण येत आहे. येथे विद्युत व्यवस्था, पाण्याची सोय तसेच सोयीचा रस्ता ही महत्त्वाची कामे तातडीने करण्यात येतील.-गीतांजली वानखेडे, सरपंच, केळवद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.