death  
नागपूर

अखेर 'त्या' व्याकुळ पित्याचा दुर्दैवी अंत! भेटीसाठी फोन करूनही मुलांचं दुर्लक्ष; परक्यांनी केले अंत्यसंस्कार

नरेंद्र चोरे

नागपूर : आजकालची मुले मायबापांच्या बाबतीत किती निष्ठुर आणि असंवेदनशील असू शकतात, याचे ताजे उदाहरण नुकतेच पाहायला व अनुभवायला मिळाले. जीवंतपणी मुलांच्या भेटीसाठी आसुसलेले ७५ वर्षीय शंकर गुरनुले यांच्या मृत्यूनंतरही त्यांची दोन्ही मुले पाहायला आली नाहीत. त्यामुळे परक्या असलेल्या लहान मुलांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. शेवटच्या क्षणी बापाची भेट घेण्याचे टाळणाऱ्या या कलयुगी पुत्रांच्या कृत्यावर परिसरात आश्चर्य व संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

ही दुर्दैवी घटना आहे रोठा (वर्धा) येथील उमेद संकल्प संस्थेतील. वर्धा जिल्ह्यातील वणी-वरुड गावचे रहिवासी असलेले शंकर यांना दोन मुले व दोन मुली आहेत. त्यांची तीन एकर शेती व स्वतःचं घर होतं. उन्हातान्हात मिस्त्री काम करून त्यांनी आपल्या चारही मुलांना लहानाचे मोठे केले. स्वतःच्या पायावर उभे केले. मुलींचेही लग्न करून आपली बापाची जबाबदारी पार पाडली. पत्नी मरण पावल्यानंतर दोन्ही मुलांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. मुलींनीही सासर व परिस्थितीचे कारण देऊन जन्मदात्याला स्वीकारण्यास नकार दिला. पोटच्या पोरांनीच दूर लोटल्यानंतर शंकर यांच्यावर नाईलाजाने भीक मागण्याची वेळ आली. गेल्या सात वर्षांपासून रस्त्यांवर भीक मागून ते पोटाची आग शांत करीत होते. मिळेल तिथे रात्र काढत होते.

एका सरकारी हॉस्पिटलसमोर मरणासन्न अवस्थेत भीक मागत असताना उमेद संस्थेच्या मंगेशी मून यांनी त्यांना आपल्या आश्रमात आणले. येथील लहान मुलांच्या सहवासात काही दिवस आनंदात घालविल्यानंतर नियतीने त्यांच्यावर पुन्हा घाला घातला. अर्धांगवायूच्या झटक्याने ते अंथरुणावर आले. मरण डोळ्यासमोर दिसत असताना त्यांना मुलांची आठवण आली. भेटीसाठी दोन्ही मुलांना फोन करण्याची मंगेशी यांना विनवणी केली. मात्र म्हातारा बाप मरणाला टेकल्यानंतरही कुणीच त्यांच्या भेटीला आले नाही. शेवटी मुलांच्या भेटीविनाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतरही मुलांना निरोप धाडण्यात आला. पोलिसांनीही फोन केले. त्याउपरही कुणीच अंत्यसंस्काराला आले नाहीत.

शंकर यांचा एक मुलगा नागपुरात, तर दुसरा सेवाग्राममध्ये राहतो. जवळ असूनही त्यांना बापाची दया आली नाही. औपचारिकता म्हणून एक मुलगी अंत्यसंस्काराला आली. या भावूक प्रसंगी परक्यांनी माणुसकीचा परिचय दिल्याबद्दल अनेकांच्या चेहऱ्यांवर समाधान होते. मात्र त्याचवेळी कलयुगी पोरांच्या कृत्याबद्दल त्यांच्यात रोषही होता.

अर्धांगवायूच्या झटक्यानंतर शंकर काकांची तब्येत अचानक ढासळली. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये पोरांना भेटण्याची त्यांची खूप इच्छा होती. मात्र फोन केल्यानंतरही कुणीच भेटायला आले नाही. शेवटी आश्रमातील मुलांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचा परिचय दिला. चार मुलं-मुली असूनही एका बापाला अशाप्रकारे मृत्यू यावा, याचेच वाईट वाटते.'
-मंगेशी मून, उमेद संकल्प संस्था

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT