Shri Ram Navami
Shri Ram Navami Sakal
नागपूर

Ram navami 2023 : गीतरामायण लोकसिद्धीची कारणमीमांसा

सकाळ वृत्तसेवा

प्रसंग : १

गेल्या वर्षीचा रामनवमीचा प्रसंग. बेंबाळ च्या विष्णू मंदिरात रामजन्माच्या सोहळ्यासाठी तयारी सुरू होती. तोवर स्पीकरवर भक्तिगीते वाजत होती. कुणीतरी एक माईकही स्टँडला जोडून मंडपात आणून ठेवला होता. मला राहवलं नाही व ती गाणी बंद करायला सांगितली. औचित्य म्हणून माझ्या मोबाईल मध्ये असणारे ''राम जन्मला ग सखे राम जन्मला..'' सुरू केलं नि मोबाईल माईक पुढे धरला.

गीत सुरू होताच बरीच मंडळी ते गुणगुणू लागली. मला नवल वाटलं; मंडपात जमलेल्या बऱ्याच जणांना ते मुखपाठ होतं. सर्वजण ऐकण्यात, पाठोपाठ गाण्यात गढून गेलीत. म्हणजे यांना या गीताची बऱ्यापैकी ओढ व जाण होती. तरीही मी कुतूहल म्हणून भजनाचा बऱ्यापैकी नाद असणाऱ्या पेटी वादकाला विचारलं....

''हे गीत कुठल्या तालात आहे?''

आपल्या लकवा मारलेल्या ओठांनी प्रसन्न हसत तो लगेच उत्तरला..

''दादरा!''

प्रसंग : २

तसा हा प्रसंग मी वाचलेला. म्हणून बातमीवजा आहे...

नागपूरमध्ये एका सेवाभावी संस्थेने गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान नुसत्या गीतरामायणावर शहरातील वेगवेगळ्या भागांत स्थानिक कलावंतांसह नृत्य व गायनाचे २३ कार्यक्रम केले. वैशिट्य हे की यात सहभागी गायक, वादक, नर्तक, निवेदक यापैकी बरीच मंडळी नवोदित होती.

गीतरामायणावर असे कित्येक प्रसंग आपण अनुभवत, वाचत असतो. कधीकाळी रेडिओवरून प्रसारित झालेल्या एखाद्या कार्यक्रमास मिळणारा हा लोकानुनय अद्भुत आहे. रेडिओ गीते लोकगीते बनून मनामनात रुढावी, त्याची अखंड लोकचळवळ बनावी, त्याची वर्षानुवर्षं पारायणे व्हावीत ही बाबच मुळात जगात अपूर्व व आश्चर्यकारक आहे. कशी मिळाली एवढी लोकसिद्धी ?

भारतात दूरदर्शन सुरू होण्याआधीचा तो काळ होता. मनोरंजनाची आधुनिक साधने प्रचलित नव्हतीच. रेडिओ मात्र घराघरांत संवादू लागला होता. पुणे आकाशवाणीने आपला आवाज हरकानी पोचविण्याचा ध्यास घेतला होता. त्यांना एका अशा सांगितिकेची नितांत होती जी मनोरंजनासोबतच भारतीय मूल्य, आदर्श व संस्कारांचीही पेरणी करेल.

हा प्रस्ताव आकाशवाणी तर्फे कार्यक्रम नियोजक सीताकांत लाड यांनी कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांच्याकडे ठेवला. गदिमांनी हे आव्हान आपले संगीतकार मित्र सुधीर फडकेंसह पेलण्याचे कबुललं. रसिकमनावर भारतीय मूल्ये रुजवायची तर रामकथेशिवाय दुसरा पर्याय तो कुठला असणार? मग काय रामायणावर गीत मालिकांची योजना ठरली.

गदिमा व बाबूजींच्या रोमारोमांत प्रसवकडा निनादू लागल्या...आणि एक अलौकिक अशी विलक्षण कलाकृती ''गीतरामायण'' जन्माला आले. गीतरामायण म्हणजे भाव, शब्द आणि नाद यांचा भावनाभावित संयोग आहे. गदिमांच्या भावगर्भित शब्दबीजाला बाबूजींनी तेवढ्याच आशयघन चाली लावून मशागत केलीय. म्हणूनच या शृंखलेतील प्रत्येक गीत बहरलेलं आहे.

प्रत्येक गीताच्या आधी येणारे निवेदन सुद्धा अलोलीक आहे. गीताचा मंगलनाद कानी पडण्याआधी येणारे सारगर्भ निवेदन रामकथेतील प्रत्येक पात्र त्यांच्या स्वभाव वैशिट्यांसह रसिकांपुढे उभे करते. मग शब्दांच्या सुरावटीतून ही पात्रे बोलू लागतात. ऐकणारा हरवून जातो . हा श्राव्यपट चित्रपट बनून त्याच्या मन:चक्षूचा ठाव घेतो.

हीच तर गीतरामायणाची किमया आहे. खरं तर आकाशवाणीने आधी गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरवलेला. पण तो टळला आणि रामनवमीपासून (१एप्रिल १९५५) प्रसारण सुरू झाले. आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारला नवे गीत. शनिवार व रविवारला त्याचे पुनःप्रसारण व्हायचे. आपल्याला त्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होता आले नाही.

पण आपण कल्पना करू शकतो. नव्वद च्या दशकात रामानंद सागर यांचे टीव्हीवर रामायण पाहण्यासाठी गावातील पाटलाच्या वाड्यावर कशी झुंबळ उडायची. आपल्या बालपणी जसं टीव्हीच अप्रूप तशीच त्याकाळी रेडिओची नवलाई असणार. खरे तर मराठी संगीत विश्वासाठी ते भारावलेले दिवसच होते. एका वर्षाच्या बेताने ५२ भागांची केलेली ही गीतमाला. पण १९५५ या वर्षी भारतीय सौर वर्षात अधिक मास आल्याने आणखी चार भागांची रचना करावी लागली. आणि ही भक्तीमाळ ५६ भागांची झाली.

घरात यांत्रिक मनोरंजनाचे श्राव्य हे एकच माध्यम असण्याच्या काळात गीतरामायण प्रसवलं. १९५५ - ५६ हा प्रसारणाचा काळ. नव्या माध्यमाची नवलाई होतीच. अशावेळी जे द्यायचं ते समाजमनाला भावणारं रुचणारं हवंच. त्यासाठीच मुद्दाम ही योजना होती. पण पारंपरिक कथासुत्रे हाताळताना निर्मिकाच्या स्वत्वाला मर्यादा येतात. ते पावित्र्य सांभाळूनही या संगीत महाकाव्याचा दर्जा अत्युच्च आहे.

रामप्रभूंची कथा, शब्दप्रभूंची पदे व नादब्रह्मी स्वरसाज हा मिलाफ उपासक रसिकांना तन्मयी करतो. ही कलाकृती इथेच थांबत नाही. ही बलस्थाने नुसतीच आदर्श पेरीत नाहीत. तर त्यातील व्यक्तिरेखा आपण अवतीभवती शोधू लागतो. तर कधी स्वतःच्याच जगण्याशी त्याचे साधर्म्य असल्याचा आपणास साक्षात्कार होतो.

तर कित्येकदा माता न तू वैरीणी, मोडू नका वचनास, जेथे राघव तेथे सीता, दाटला चोहीकडे अंधार, नको करू वल्गना, सेतू बांधा रे सागरी, आज का निष्फळ होती बाण, लोकसाक्ष शुद्धी झाली अशा ओळी वर्तमानी बातम्यांचे मथळे बनतात. कुठल्याही काव्यातील शब्द जेव्हा मानवी जीवनाशी एवढे एकरूप होतात तेव्हा ते शब्द न राहता जीवनाचे रहस्य उलगडणारी सुभाषिते बनतात.

गीतरामायणाच्या प्रसारासाठी बाबूजींनी घेतलेला ध्यासही विलक्षण आहे. त्यासाठी त्यांनी देशविदेशात तब्बल अठराशे प्रयोग केलेत. म्हणूनच लता मंगेशकर, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, अशा बावीस दिग्गज गायकांनी रेडिओवर गायलेले गीतरामायण खऱ्या अर्थाने रुढले ते फडकेंच्या आवाजातच. यातील शब्द आणि संगीताचीही जादू पहा; गीतरामायणाचे आजवर हिंदी , गुजराती, कानडी, बंगाली,

आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा कितीतरी भाषेत भाषांतरे झालीत पण गदिमांच्या भावसामर्थ्याला कुणी धक्का लागू दिला नाही. आणि सर्व भाषेतील या गितकथा बाबूजींच्या चालीवरच गायल्या जातात. म्हणूनच काळ बदलेल माणसं बदलतील पण गीतरामायण पिढ्यानपिढ्या भारतीय मनामनात रुंजी घालत राहील.कारण या शृंखलेतील एका गीतात गदिमांनी तसा वरच प्रभूजवळ मागीतलाय...

अखंड वदने अखंड भाषा।

सकलांची मज एकच आशा।।

श्रीरामाचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा।

प्रभू मज एकची वर द्यावा।।

त्यामुळेच देशाच्या प्रांतोप्रांतीचे असंख्य रसिक या रेडिओ श्रुतिकेने जोडलीत. आणि ही गाणी भारतीय संस्कृतीचे जीवनसंगीत बनली. नऊ भाषांत भाषांतरे झालीत. तशीही भावरसाला भाषा कुठलीही चालते. ती फक्त हृदयाची असावी लागते. आणि हेच ''गीतरामायण'' च्या लोकसिद्धीचे खरे कारण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT