नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देश लॉकडाउन झाला. या काळात कंपन्या, दुकाने सर्वच बंद राहिले. गाठीला बांधलेले पैसे या काळात खर्च झाले. देश "अनलॉक' होण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक व्यावसायिक अजूनही व्यवसाय सुरू करायला तयार नाहीत. यामुळे परप्रांतीय कामगार, मजुरांनी गावाकडचा रस्ता धरला आहे. गावी जाण्याचेही पैसे नासल्याने प्रयागराजच्या तिवारी कुटुंबाने चक्क शेत गहाण ठेवून पैशांची तजविज केली.
शासकीय मदतीसंदर्भात मोठमोठ्या वल्गना करण्यात आली. पण, लॉकडानमध्ये दमडीचीही मदत मिळाली नाही. गावी जाण्यासाठी नगरसेवक, पोलिस, प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही काहीच उपयोग झाला नसल्याची कैफीयत या कुटुंबाने व्यक्त केली. अशोक तिवारी मुळचे प्रयागराजचे. कामाच्या शोधात पत्नी आणि तीन मुलांसह ते नागपुरात आले. मस्कासात येथील कपड्यांच्या कारखान्यात काम मिळाले. महालातील कोतवाली परिसरात भाड्याच्या खोलीत त्यांचा सुखाचा संसार सुरू होता.
अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. सारेच मार्ग बंद झाले. सर्व सुरळीत होईल. या आशेवर ते एक एक दिवस ढकलत होते. कारखाना मालकाकडून कोणतीच मदत मिळाली नाही. पै-पै जोडून जमा केलेली रक्कमही या काळात संपली. सरकार आणि संस्थांकडून गरजुंना मदत केली जात असल्याचे दररोज ऐकत होतो. पण, प्रयत्न करूनही आपल्यापर्यंत एकाही पैशाची मदत पोहोचली नसल्याचे अशोक तिवारी यांनी सांगितले. मालकाकडे विचारणा केली तर त्याने गावाकडचा रस्ता दाखवला.
लॉकडाउनच्या काळातही मजूर स्वगृही परतत असल्याची माहिती टिव्हीवरून मिळत होती. मिळणाऱ्या माहिती प्रमाणे ऑनलाईन अर्ज भरला, नगरसेवकाकडेही मागणी केली, कोतवाली पोलिस ठाण्यातही चकरा मारल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला, पण कुणीच मदतीला आले नाही. दरम्यानच्या काळात पैसेही संपले होते. एकएक दिवस ढकलणेही कठीण झाले होते. सर्व आशाही मावळू लागल्या होत्या.
"जान है तो जहान है' म्हणत गावाकडे पैशांची मागणी केली. त्यांच्याकडेही पैसे नसल्याने जमीन गहान ठेवून पैशांची तजवीज केली. पैसे मिळताच रेल्वेचे बुकिंगही सुरू झाले. जीवनाच्या पुनर्बांधणीचा ध्याय घेऊन तिवारी कुटुंब सोमवारी रात्रीच्या रेल्वेगाडीने प्रयागराजकडे रवाना झाले. त्यांच्या तिन्ही चिल्यापिल्यांच्या डोळ्यांतही घरच्यांच्या भेटीची ओढ स्पष्ट दिसत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.