Nagpur news
Nagpur news esakal
नागपूर

Nagpur : उपराजधानी गारेगार ;पारा दोन दिवसांत अकरा अंशानी घसरला

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : उपराजधानीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरण एकदम गारेगार झाले. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांत पारा तब्बल अकरा अंशानी घसरला. गारवा व बोचऱ्या वाऱ्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी शहरवासींनी हिलस्टेशनचा अनुभव घेतला. हिवाळ्यात आलेल्या या पावसाने जणू नागपुरात ‘हिवसाळा’ हा नवाच ऋतू तयार झाला. विदर्भात आणखी दोन दिवस येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

आज नागपूरकरांची सकाळ उजाडली ती पावसानेच. पहाटेपासूनच शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी साडेआठपर्यंत रिमझिम बरसल्यानंतर अर्धा ते पाऊण तास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. पावसामुळे जागोजागी पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळची वेळ असल्याने कार्यालयांमध्ये जाणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. संततधार पावसामुळे ऐन हिवाळ्यात नोकरदार आणि विद्यार्थ्यांना स्वेटर, जॅकेट आणि मफलरवर रेनकोट परिधान करावा लागला व छत्र्या घेऊन बाहेर पडावे लागले.

संपूर्ण दिवसभर सूर्यनारायणाचे दर्शन होऊ शकले नाही. बोचरे वारे व गारठ्यामुळे दिवसाचे तापमान पुन्हा घसरून पारा १९.२ अंशांवर आला. दोन दिवसांत नागपूरच्या कमाल तापमानात तब्बल अकरा अंशांची घट झाली. सर्वच जिल्ह्यातील पारा २५ च्या खाली आला.

ढगांच्या दाटीमुळे सकाळी व सायंकाळी शहरावर धुक्याची दाट चादर पसरली होती. अवकाळी पावसाचा बहुतेकांना त्रास झाला असला तरी हिलस्टेशन बनल्याने अनेकांनी आल्हाददायक वातावरणाचा आनंदही घेतला. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या जाण्याच्या भीतीने शेतकरी मात्र चिंतित आहे. दोन दिवसांच्या पावसाचा कापूस, तूर, हरभरा, गहू, कांदा आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

विदर्भात सर्वत्र पाऊस

विदर्भात सोमवारपाठोपाठ मंगळवारीही जवळपास सगळीकडेच पाऊस झाला. सर्वाधिक ४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद वर्धा जिल्ह्यात करण्यात आली. तर नागपुरात ४६.२ मिलिमीटर, अकोला ४२.६ मिलिमीटर, वाशीम ३६ मिलिमीटर, अमरावती ३४.६ मिलिमीटर, बुलडाणा येथे ३२ मिलिमीटर, चंद्रपूर ३१.४ मिलिमीटर, गोंदिया २३ मिलिमीटर आणि यवतमाळ येथे १५ मिलिमीटर पाऊस बरसला.

आज-उद्याही येलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे हलका पाऊस व ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. त्यानंतर आकाश निरभ्र होऊन हळूहळू थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अरबी समुद्रातील ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे सध्या विदर्भ व महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाळी वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT