वर्धा : लॉकडाऊनमुळे बंद झालेली शेतमाल खरेदी पुन्हा सुरू झाली. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी होत असला तरी अनेक अडचणींची शर्यत पार करावी लागत आहे. खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने भीतीपोटी अनेक ग्रेडरने खरेदी प्रक्रियेतून काढता पाय घेतला. यामुळे कुठे ग्रेडर तर कुठे खरेदी विक्री संघाचे कर्मचारीच चणा आणि तुरीचा दर्जा ठरवत आहेत. यामुळे खरेदी अडचणीत येत आहे. अशातच पावसाचे ढग दाटून आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याचेच संकेत मिळत आहेत.
चण्याकरिता नाफेड आणि तुरीकरिता एफसीआयकडे अनेक शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. पण, खरेदीला गर्दी नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून आहे. अशात पावसाचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे शासनाने तूर आणि चणा खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
तुरीची खरेदी सुरू होऊन बराच काळ झाला असला तरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची तूर घरीच पडून आले. तर चणा खरेदीचा प्रारंभ विलंबाने झाला आणि खरेदीची अंतिम तारीख 15 जून देण्यात आली आहे. एवढ्या काळात ही खरेदी होईल अथवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यातच खरेदी करण्याकरिता नाफेड आणि एफसीआय या दोन्ही एजन्सीकडे ग्रेडरची कमी असल्याने येणाऱ्या शेतमालाची तपासणी करणे अवघड होते. यामुळे नोंदणीचे काम करणाऱ्या खरेदी-विक्री संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून ही तपासणी करण्यात येत आहे. यात खरेच एफएक्यूचा दर्जा सांभाळला जातो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात योग्य शेतमाल बाजूला जाणे आणि ओळखीच्या शेतकऱ्याचा शेतमाला खरेदी करणे, असा प्रकार होण्याची शक्यता आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाच्या आदेशानुसार हमीभावाच्या खरेदीसाठी पहिले नोंदणी करणे अनिवार्य होते. यामुळे शेतकऱ्यांनी या नियमाचे पालन केले. यात वर्धेत तुरीकरिता एकूण 6100 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी 1196 शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 11172.17 क्विंटल तुरीची खरेदी झाली. उर्वरित शेतकरी अद्याप रांगेत आहेत. तर चण्याकरिता 7793 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आतापर्यंत यापैकी 787 शेतकऱ्यांकडून 11197.32 क्विंटल चण्याची खरेदी झाली. या खरेदीपोटी पाच कोटी 46 लाख रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
अनेक ग्रेडर गेले काम सोडून
चणा आणि तुरीची खरेदी करण्याकरिता मार्केटिंग कार्यालयाकडून केंद्र सुरू करण्यात आले. नाफेडमार्फत चणा आणि एफसीआय तुरीची खरेदी सुरू आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याने अनेक ग्रेडर काम सोडून गेले आहेत. यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विलास आबदेव, सहाय्यक मार्केटिंग अधिकारी, वर्धा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.