Rules of lockdown will get more strict said Collector of Amravati
Rules of lockdown will get more strict said Collector of Amravati  
विदर्भ

लॉकडाउनचे निर्बंध अधिक कडक करणार; अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे संकेत

सुधीर भारती

अमरावती : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी (ता.22) सायंकाळपासून एका आठवड्याचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यानंतरही काही बेशिस्त नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने लॉकडाउनचे निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.

लॉकडाउनदरम्यान सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार आहेत. त्यामध्ये औषधांची दुकाने, किराणा, भाजीपाला विक्री आदींचा समावेश आहे. रुग्णालयाशी अटॅच मेडिकल्सला मात्र मुभा राहणार आहे. हॉटेल्स तसेच उपाहारगृहातून निर्धारित वेळेत पार्सलची सुविधा उपलब्ध राहील. हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून सुविधा उपलब्ध करून दिल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

...तर वाहने होणार जप्त

शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक कारणांसाठी नागरिकांना बाहेर जाण्यास मुभा राहील. मात्र अनेक बेशिस्त लोकं केवळ फेरफटका मारण्यासाठी शहरात येताहेत, अशा लोकांची वाहेन जप्त करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

"रॅकेट'बाबत चौकशीचे आदेश

जिल्ह्यातील काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह देण्याची सुविधा उपलब्ध असल्याचा आरोप कालच जिल्हापरिषदेच्या सभेत करण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक त्यांच्या स्तरावर करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

लॉकडाउनबाबत समाधानी

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाकडून एका आठवड्याचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांची परिस्थिती आणि आजची स्थिती यामध्ये निश्‍चितच फरक पडला आहे. आज 90 टक्के लोकं घरात आहेत. त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसून येतील, असा दावा त्यांनी केला.

एसटी, ऑटोरिक्षा बंदच

एसटी तसेच ऑटोरिक्षांना लॉकडाउनच्या काळात बंदी घालण्यात आली. मात्र काही ठराविक मार्गावर परवानगी देण्यात आली आहे. शहरातील बसस्थानक, रेल्वेस्टेशन या भागातच ऑटोरिक्षाला परवानगी राहणार आहे.

प्रवाशांची गैरसोय

लॉकडाउन असतानाही बाहेरगाववरून अनेक प्रवासी अत्यावश्‍यक कामासाठी शहरात दाखल झालेत. रेल्वेस्थानक तसेच बसस्थानक परिसरातून वाहतुकीची व्यवस्था नसल्याने अनेकांनी पायीच इच्छितस्थळ गाठले तर बंदोबस्तावरील पोलिसांकडून अनेकांची कसून चौकशी करण्यात आली. अनेक प्रवाशांना तर व्यवस्था नसल्याने रात्रभर बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात मुक्काम करावा लागला.

शासकीय कार्यालयांत नगन्य उपस्थिती

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहे. सर्व शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली असून शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती मंगळवारी (ता.23) नेहमीपेक्षा फारच कमी दिसून आली. शासनाच्या निर्देशानुसार कार्यालयामध्ये केवळ 15 टक्के किंवा संख्येच्या 15 इतक्‍या कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT