चंद्रपूर : शौचास गेलेल्या एका सात वर्षीय चिमुकल्यास बिबट्याने उचलून नेत ठार केले. मुलगा घरी परतला नसल्याचे बघून कुटुंबीयांनी रात्रभर शोधमोहीम राबविली. मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नाही.
शनिवार सकाळच्या सुमारास चिमुकल्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृत चिमुकल्याचे नाव भावेश तुराणकर असे आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मासळ या गावात ही घटना घडली. या घटनेने मासळ परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच मासळ हे गाव आहे. मासळ गावाला लागूनच दुर्गापूर, ऊर्जानगरचा परिसर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर झुडपी जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट्याचा वावर आहे. वाघ, बिबट्यांकडून आजवर अनेकांवर हल्ले झाले आहेत. शुक्रवार (ता. २०) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मासळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील परिसरात भावेश शौचास गेला होता. मात्र, बराच वेळ लोटून गेल्यानंतरही भावेश घराकडे परतला नव्हता.
मुलगा घरी परतला नसल्याचे बघून भावेशचे आई, वडील आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. रात्री दहा, अकरा वाजेपर्यंत भावेशचा काहीच पत्ता लागला नव्हता. शेवटी तुराणकर कुटुंबीयांनी दुर्गापूर पोलिस ठाणे गाठले. भावेश बेपत्ता असल्याची तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार लता वाढीवे यांनी पथकाला सोबत घेत शोधमोहीम राबविली.
रात्री उशिरापर्यंत ऊर्जानगर, दुर्गापूर, मासळ आणि जंगल परिसरात भावेशचा शोध घेण्यात आला.मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. याचदरम्यान परिसरात बिबट दिसल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या पोलिसांनी बिबट्याने मुलास उचलून नेल्याची शंका व्यक्त केली. तुराणकर यांच्या घरापासून काही अंतरावर एका झाडावर काहींना बिबट बसून दिसला.
त्यामुळे पोलिसांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली. पोलिस आणि वन विभागाच्या पथकाने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, बिबट्याने तेथून पळ काढला. शोधमोहीम राबवीत असतानाच शनिवारी (ता. २१) एका झाडाखाली भावेशचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. अतिशय वाईट पद्धतीने भावेशला बिबट्याने ठार केले होते. भावेशचा मृतदेह मिळताच कुटुंबीयांनी टाहो फोडला.
बिबट्याला जेरबंद करा
सात वर्षाचा भावेश हा पहिल्या वर्गात शिकत होता. बिबट्याने त्याला उचलून नेत ठार केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वेकोलिचे कार्यालय याच परिसरात आहे. येथून काही अंतरावर मांस विक्रेते उरलेले मांस फेकून निघून जातात. रस्त्यावर खाद्य सहज मिळत असल्याने बिबट्याचा या भागात वावर वाढला आहे. हल्लेखोर बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. वाघ, बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.