वणी (जि. यवतमाळ) : दोन हजार पाचशे लोकवस्तीचे नदीकाठावर वसलेले गाव. ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय. या गावात मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा नाही. नदीपात्रात अंत्यसंस्कार आटोपता घ्यावा लागतो. अंत्यसंस्काराच्या जागेसाठी प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असल्याने जगण्याने छळलेल्या माणसाची मरणानंतरही सुटका नाही, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
सरणावर रचलेला मृतदेह जळत असताना पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. सोमवारी (ता.15) घडलेल्या या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. वणी तालुक्यातील पळसोनी येथील सीताराम बेलेकर यांचे अपघाती निधन झाल्यावर पळसोनी येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी गावालगत असलेल्या निर्गुडा नदीपात्रात अग्नी देण्यात आला. सरणावर मृतदेह जळत असताना अचानक पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. पाहता पाहता हे पात्र तुडुंब भरले. जळणारा मृतदेह सरणासह पाण्याच्या प्रवाहाला लागला. उपस्थितांच्या मनाचा थरकाप उडविणारा हा प्रसंग पाहून सारेच अवाक झाले. काहींनी धाव घेत पेटते सरण अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहाने हे पेटते सरण कोसो दूर गेले. तब्बल 24 तासांच्या अथक प्रयत्नाने मृतदेह शोधण्यात आला.
या प्रकारामुळे प्रशासनाची खुजी मानसिकता समोर आली. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मागील दहा वर्षांपासून केली जात आहे. ग्रामपंचायतीने अनेकदा ठराव घेऊन कागडीघोडे समोर सरकविले. महाराष्ट्र ग्रामीण योजना व वेकोलीच्या वेल्फेअरकडून निधीही मंजूर झाला होता. मात्र, स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने निधी परत गेला.
दरम्यान, स्मशानभूमीच्या जागेसाठी दोन ठिकाणी जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्याला विरोध झाल्याने जागेचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. गावालगत शासनाची इक्लासची जमीन आहे. तेथे स्मशानभूमी बांधण्यासाठी जागा मिळावी, म्हणून ग्रामपंचायतमार्फत ठराव घेण्यात आला आहे. मात्र, अजूनपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब झाले नाही.
परिणामी मृतदेहाची अवहेलना होत आहे. अनेकदा कागदी घोडे नाचवूनही अंत्यसंस्काराची जागा लालफीतशाहीत अडकली आहे. नदीपात्रात वाहून गेलेला मृतदेह शोधण्यात प्रशासनाची त्रेधातिरपट उडाली होती. आता तरी संवेदना जागी होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे.
स्मशानभूमीचा प्रश्न कायमच
स्मशानभूमीच्या जागेकरिता ठराव घेण्यात आला आहे. स्मशानभूमीचे बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध झाला होता. मात्र, जागेची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्न तसाच राहिला आहे.
जीवन बेलेकर, नागरिक, पळसोनी (जि. यवतमाळ).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.