wardha ZP president gave roses to officers who came late in office  
विदर्भ

वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षांची गांधीगिरी; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे उभे राहून गुलाबपुष्पाने स्वागत

रुपेश खैरी

वर्धा : ग्रामविकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांकडून शिस्तीची वाट लावल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी मंगळवारी (ता. 15) अभिनव उपक्रम राबविला. त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून उशिरा येणाऱ्या विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. त्यांच्या या गांधीगिरीमुळे सारेच कर्मचारी अवाक्‌ झाले.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष वैशाली येरावर, शिक्षण व आरोग्य सभापती मृणाल माटे यांच्यासह महिला व बालकल्याण सभापतींची उपस्थिती होती. यावेळी आलेल्या कर्मचाऱ्यांची एका रजिस्टरवर नोंदणी करून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. यात तब्बल 205 कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेला दांडी मारल्याचे पुढे आले आहे. यात काही विभाग प्रमुखांचाही समावेश होता. त्यांच्यावर आता काय कारवाई होते याकडे अनेकांच्या नजरा आहे.

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांनी कार्यालय गाठण्याची वेळ सकाळी 9.45 मिनिटांची आहे. तर विभाग प्रमुखांनी सकाळी 10 वाजेपर्यंत आपले कार्यालय गाठण्याच्या सूचना आहेत. पण असे होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी आज सकाळी 10 वाजतापासून 12 वाजेपर्यंत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांना समज देण्यासाठी गांधीगिरी केली. यात उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपुल जाधव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील मेसले, शिक्षणाधिकारी सोनवणे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी शेळके हे चार अधिकारी 10.30 ते 10.57 या काळात कार्यालयात दाखल झाले.

इतर प्रवेशद्वारे बंद

जिल्हा परिषद इमारतीत शिरण्यासाठी एकूण तीन दारे आहेत. या तीन दारातून कर्मचारी येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी वेळेनंतर इतर दोन दारे बंद करून मुख्य दारच सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. यामुळे सर्वच कर्मचाऱ्याची नोंद करण्यात आली.

11 वाजेपर्यंत येणाऱ्यांना एक रोपटे आणि कुंडीचा दंड

आज राबविण्यात आलेल्या या गांधीगिरी मोहिमेत सकाळी 11 वाजेपर्यंत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक रोपटे आणि कुंडीचा दंड देण्यात आला आहे. तर 11 वाजतानंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. हा प्रकार यानंतरही असाच सुरू राहिल्यास कर्मचाऱ्यांना कठोर कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इमारतीच्या स्वच्छतेचा घेतला आढावा

या गांधीगिरीनंतर कर्मचाऱ्यांचे मस्टर आपल्या ताब्यात घेत अध्यक्षांनी जिल्हा परिषद इमारतीत असलेल्या स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यांना अनेक कार्यालयाच्या गॅलरीत अडगळीच्या वस्तू पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी या वस्तू तेथून हटविण्याच्या सूचना विभागाच्या कर्मचाऱ्यांना केल्या.

अनेक विभाग प्रमुखांची दांडी

जिल्हा परिषदेत असलेल्या सर्वच विभाग प्रमुखांनी त्यांच्या वेळेत कार्यालयात हजर राहणे अनिवार्य आहे. पण, अनेक विभागप्रमुख 12 वाजेपर्यंतही कार्यालयात आले नसल्याचे दिसून आले. या खातेप्रमुखांनी रजा टाकल्या काय याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाकाळात अर्ध्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामे करण्यात आली. यामुळे अनेक कामे अपूर्ण आहेत. यातच जिल्हा परिषदेत रिक्‍त पदांचा अंबार आहे. अशा स्थितीत जर विभाग प्रमुखांसह कर्मचारी उशिरा येतील तर कामे कशी होती. यामुळे आज ही मोहीम राबविण्यात आली. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
- सरिता गाखरे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT