Ashadhi wari 2022 : Vaishnav Fair at Pandharpur Ashadhi Yatra
Ashadhi wari 2022 : Vaishnav Fair at Pandharpur Ashadhi Yatra  
वारी

Ashadhi wari 2022 : पंढरीत वैष्णवांचा मेळा

सकाळ वृत्तसेवा, शंकर टेमघरे

पंढरपूर - टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत आज लाखो वारकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या आनंद सोहळ्यात सहभाग घेतला. दिंड्या पताकांसह वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने नगरप्रदक्षिणा सोहळा पूर्ण केला. त्यामुळे आज दिवसभर प्रदक्षिणा मार्गावर जणू भक्तीचा महापूर पाहायला मिळाला.

चंद्रभागा नदी काठी हजारो वारकरी भजन कीर्तनात तल्लीन झाले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गोपाळपूरच्या पुढे गेली होती. पदस्पर्श दर्शनासाठी आज २५ तासाहून अधिक वेळ लागत होता. श्री विठ्ठल दर्शनानंतर धन्य झालो हो संसारी, आम्ही देखिली पंढरी, अशी भावना वारकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती.

आषाढीच्या आनंद सोहळ्यासाठी सुमारे ११ ते बारा लाख वारकरी पंढरपुरात आल्याने अवघ्या पंढरीला भक्तीच्या महासागराचे रुप आले होते. टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करणारे वारकरी सर्वत्र दिसत होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागा नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी पहाटे चारपासून भाविकांनी गर्दी केल्याने चंद्रभागेचे वाळवंट वारकऱ्यांनी फुलून गेले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गोपाळपूर रस्त्यावर गेली होती.

बीड जिल्ह्याला यंदा मान

विठुरायाच्या दर्शन रांगेतील एका वारकरी दांपत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत पूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो. यंदा हा मान मुरली बबन नवले (वय ५२) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले (वय ४८, रा. रुई, ता. गेवराई, जि. बीड) या शेतकरी दांपत्यास मिळाला. त्यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवले यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा आहे. १९८७ पासून गेली बारा वर्षे मुरली नवले हे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरीच्या वारीत सहभागी होत आहेत.

पालख्यांनी भक्तीला उधाण

पंढरपूर - श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय यांचे पालखी सोहळ्यांसमवेत लाखो वारकरी शनिवारी पायी पंढरीत दाखल झाल्याने भक्तीला उधाण आले.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या आषाढी पायी वारीतून तसेच एसटी, खासगी वाहनांतून आलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागा स्नान, पुंडलिकाचे आणि नामेदव पायरीचे दर्शन, मंदिर प्रदक्षिणा, विठ्ठलाच्या मंदिराचे कळस दर्शन करुन आपली आषाढी वारी विठुराया चरणी रुजू केली. चंद्रभागेला पाणी सोडल्यामुळे वारकऱ्यांना सोयीचे झाले. सकाळी साडेआठच्या सुमारास माऊलींची पादुका मालक राजाभाऊ आरफळकर यांनी चंद्रभागा स्नानासाठी नेल्या होत्या. त्यावेळी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, विश्वस्त श्रीकांत टिळक, बाळासाहेब चोपदार हेही उपस्थित होते. त्यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. माऊलींच्या पादुकांना आरफळकर यांनी स्नान घातले.

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सकाळी साडेनऊच्या सुमारास स्नान घालण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे आदी उपस्थित होते. सर्व संतांच्या पादुकांना स्नान घालून प्रदक्षिणा केली.

फिरती वारी

रविवार सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने जोरात पाऊस येईल, या भीतीने अनेकांनी कळसदर्शन घेऊन दुपारीच परतीचा मार्ग धरला. त्यामुळे एसटी स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. यंदा एका दिवसांचीच फिरती वारी झाली. दुपारी चारनंतर विठ्ठल प्रदक्षिणेच्या ठिकाणी गर्दी कमी झाली. त्यामुळे पंढरपूरमधील व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले.

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक (वै.) ह भ. प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर ( ७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक ( ५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्काराचे वितरणही या वेळी करण्यात आले.

रथयात्रेचा सोहळा उत्साहात

आषाढी आणि कार्तिकी एकादशी दिवशी लाखोंच्या संख्येने आलेल्या सर्वच वारकऱ्यांना गर्दीमुळे मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही. त्यांना विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी या दोन्ही यात्रांच्या वेळी एकादशीला रथयात्रेचा सोहळा करण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज माहेश्वरी धर्मशाळेपासून परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात रथयात्रेला प्रारंभ झाला. रथाचे दर्शन घेण्यासाठी प्रदक्षिणा रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वारकरी थांबले होते. नगर प्रदक्षिणा करून रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेजवळ ओढत आणण्यात आला. तिथे रथयात्रेची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT