दिवाळीत खरेदी करा स्वस्तात सोनं; काय आहे मोदी सरकारची 'गोल्ड ऑफर'

संजय महाजन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

  • मोदी सरकारची 'गोल्ड ऑफर'
  • दिवाळीत खरेदी करा स्वस्तात सोनं
  • जवळपास दोन हजारांची मिळणार सवलत

दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता योग्य संधी चालून आलीय. तुम्ही जर दिवाळीत सोनं खरेदी करणार असाल तर तोळ्याला जवळपास दोन हजारांची सवलत मिळेल. केंद्रातल्या मोदी सरकारनं एक अनोखी योजना आणली.

हे सोनं 3 हजार 835 रुपये ग्राम या दरानं तुम्हाला खरेदी करता येईल. म्हणजेच दहा ग्रॅमसाठी तुम्हाला 38 हजार 350 रुपये खर्चावे लागतील. हे सोनं ऑनलाईन खरेदी केल्यास त्यावर प्रती ग्राम 50 रुपये सवलत आहे. म्हणजेच 10 ग्रॅमसाठी तब्बल 500 रुपये सवलत मिळेल. म्हणजे 38 हजार 350 रुपयांचं सोनं 37 हजार 850 रुपयांत मिळेल. बाजारातला सोमवारचा सोन्याचा दर 39 हजार 565 रुपये होता. म्हणजेच हे सोनं तुम्हाला 1 हजार 715 रुपये स्वस्तात मिळेल.

  • मोदी सरकार सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेतून सोन्याची विक्री करणार आहे.
  • महत्त्वाचं म्हणजे या सोनंखरेदीवर करांमध्येही लाभ मिळतो. त्याला जीएसटीही लागत नाही.
  • बाजारातून केलेल्या सोनं खरेदीवर 3 टक्के जीएसटी लागतो. तर या बॉण्डवर वार्षिक अडीच टक्के व्याज मिळेल.
  • या योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याची किंमत रिझर्व्ह बँक निश्चित करते.

मात्र, हे सोनं बॉण्ड स्वरूपात असल्यानं त्याच्या चोरीची अजिबातच भीती नाही. मात्र, ते अंगावर बाळगता येत नाही. एका वित्तीय वर्षात एक व्यक्ती कमाल 500 ग्रॅम सोनं खरेदी करू शकते तर किमान 1 ग्रॅम सोनं खरेदी करू शकेल.

भारतीयांमध्ये सोन्याचं खूप आकर्षण आहे. प्रामुख्यानं त्याचा देखावा करण्याकडे भारतीयांचा कल असतो. सोन्यातील गुंतवणूक हमी देणारी असते, तोच विचार करून बॉण्डमध्ये गुंतवणूक केली तर कायमस्वरूपी सोनं तुमच्याकडे राहील.

WebTitle : buy gold with discounted rate in this diwali check what is gold offer

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buy gold with discounted rate in this diwali check what is gold offer