esakal | ५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; २६ जूनला होणार मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

payment

कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ होणार आहे. तसेच पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतनातही वाढ होणार आहे.

५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; २६ जूनला होणार मोठा निर्णय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी पुढे आली आहे. महागाई भत्ता म्हणजे डीए मध्ये वाढ करण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे ५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६० लाख केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) बाबतची खूप दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टिव्ह मशिनरी (JCM) ची अर्थ मंत्रालय आणि कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DOPT)च्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. २६ जून २०२१ रोजी होणाऱ्या या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. (7th pay commission good news for central govt employees DA arrear meeting on 26th June)

बैठकीत कशाबाबत निर्णय होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणारा डीए आणि पेन्शनधारकांना मिळणारा डीआर याबाबत वित्त मंत्रालयासमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. ही बैठक कॅबिनेट सचिवांच्या देखरेखीखाली होईल. गेल्या १८ महिन्यातील महागाई भत्ता आणि थकबाकी यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. कोरोनाच्या वाढच्या प्रकरणांमुळे हा निर्णय वारंवार पुढे ढकलण्यात आला होता, अशी माहिती नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी दिली.

हेही वाचा: भारतातील 'या' कंपनीला पहिल्या तिमाहीत तब्बल ४२७२ कोटी रुपयांचा नफा

तीन हप्त्यांमध्ये मिळणार महागाई भत्ता

जून २०२१ पर्यंत सरकारने महागाई भत्ता गोठविला आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ च्या डीएच्या प्रतीक्षेत आहेत. कर्मचाऱ्यांचे डीए तीन हप्त्यांमध्ये लवकरच दिले जातील, अशी घोषणा अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत केली आहे. मात्र ते कधी मिळणार याची माहिती दिली नव्हती. पण जून २०२१ मध्ये डीएबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

२८ टक्के मिळणार डीए

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना सध्या १७ टक्के डीए मिळत आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर जून २०२० मध्ये महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढविण्यात आला. या व्यतिरिक्त जानेवारी २०२१ मध्ये डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे महागाई भत्ता २८ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा फायदा ५२ लाखांहून अधिक कर्मचारी आणि ६० लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ होणार आहे. तसेच पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतनातही वाढ होणार आहे.

हेही वाचा: Sensex चा उच्चांक; कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचा सकारात्मक परिणाम

दरम्यान, कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे की, सरकारने गेल्या १८ महिन्यांतील डीएच्या थकबाकीसुद्धा द्याव्यात. शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेव्हल-१ मधील कर्मचार्‍यांना डीएची थकबाकी ११,८८० ते ३७,५५४ रुपये मिळू शकेल. तर लेव्हल-१३ आणि लेवल-१४ साठी कर्मचार्‍यांच्या हातात डीएची थकबाकी १ लाख ४४ हजार २०० रुपये ते २ लाख १८ हजार २०० रुपयांपर्यंत मिळू शकेल.

(Edited by : Ashish N. Kadam)

अर्थविश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.