दिवाळी तर झाली, आताच आहे सोने खरेदीची उत्तम संधी!

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 23 November 2020

आता सोने-चांदी खरेदीची उत्तम संधी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली: जागतिक बाजारातील बदलामुळे आज भारतीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या किंमतीत सौम्य घट झाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याच्या दर प्रति 10 ग्रॅमला 50 हजार 211 रुपयांवर गेले आहेत. तर चांदीच्या दरात 0.16 टक्क्यांची घट होऊन चांदीची प्रतिकिलो दर 62 हजार 60 रुपये झाले आहेत. 

आता सोने-चांदी खरेदीची उत्तम संधी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कारण कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने भविष्यात किंमती वाढण्याची शक्यता असल्याची माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.

मागील सत्रात सोन्याचे दर 0.54 आणि चांदी 1.2 टक्क्यांनी वाढले होते. पण मागील आठवड्याचा विचार केला तर, सोन्याचे दर  700 रुपये प्रति 10 ग्रॅमला उतरले होते. हा सगल दुसरा आठवडा होता ज्यावेळेस सोन्याचे दर घटले होते. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 56 हजार 200 पर्यंत गेले होते.

Share Market: सत्राच्या सुरुवातीलाच बाजारात तेजी; सेन्सेक्स 44,225.53 अंशांवर

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत-
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज डॉलरमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी वाढून 1,874.25 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीच्या दर 0.4 टक्क्यांनी वाढून ते प्रति औंस 24.24 डॉलरवर गेले आहे. आजचा डॉलर निर्देशांक 0.17 टक्क्यांनी घटला आहे. 

भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार- 
भारतात 2020मध्ये सोन्याची आयात वाढून ऑगस्टमध्ये 3.7 अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलरची होती. चीननंतर भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी लागतो.

आरबीआयच्या नावावर अनोखा विक्रम ; यूएस फेडला देखील टाकले मागे

भारताकडील सोन्याचा साठा- 
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after diwali there is great time to buy gold and silver