भारतात 'ही' कंपनी देणार दहा लाख लोकांच्या हाताला काम 

Jeff Bezos
Jeff Bezos

बंगळूर : भारतात 2025पर्यंत ऍमेझॉन 10 लाख रोजगारांची निर्मिती करणार आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी म्हटले आहे. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, लॉजिस्टिक्‍स आणि उत्पादन यांसारख्या विविध उद्योगांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगारनिर्मिती कंपनी करणार आहे.

गेल्या 6 वर्षांत ऍमेझॉनने केलेल्या गुंतवणुकीत भारतात 7 लाख रोजगारांची निर्मिती केली आहे. तसेच, देशातील एक कोटींहून अधिक सूक्ष्म, लघू आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना (एमएसएमई) व्यवसायासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ भारतीय बाजारपेठेत चांगली कामगिरी करीत आहे. जगातील इतर बाजारपेठांपेक्षा ऍमेझॉन प्राइम व्हिडिओची भारतातील कामगिरी अधिक उजवी आहे.

त्यामुळेच ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी भारतातील गुंतवणूक दुप्पट करण्याचे ठरवले आहे. सध्या भारत भेटीवर असलेल्या जेफ बेझोस यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची भेट घेतली आहे. यात शाहरुख खान आणि झोया अख्तर यांच्याशी साधलेल्या संवादाचाही समावेश आहे. सध्या संपूर्ण जगच टीव्हीचे सुवर्णयुग अनुभवत असून, ऍमेझॉनला जगातील सर्वांत ग्राहकाभिमुख स्टुडिओ बनवणार आहे, जेफ बेझोस यांनी म्हटले आहे. 

बेझोस यांच्या नियोजनात भारताला विशेष स्थान आहे. प्राइम व्हिडिओ जपान, जर्मनी आणि अमेरिकेत चांगली कामगिरी करीत आहे. भारतात ऍमेझॉन प्राइम व्हिडिओची कामगिरी सर्वांत चांगली आहे. भारतात नेटफ्लिक्‍स आणि हॉटस्टार हे ऍमेझॉन प्राइम व्हिडिओचे मुख्य स्पर्धक आहेत. 

पीयूष गोयल यांचा "यू-टर्न' 
ऍमेझॉन भारतात 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार म्हणजे काही विशेष नाही, असे वक्तव्य करून करून वादात सापडलेले केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी "यू-टर्न' घेतला. गोयल यांनी आपण ऍमेझॉन विरोधी नसल्याचे सांगत ऍमेझॉनच्या गुंतवणुकीचे स्वागत केले. मात्र, कंपनीने देशातील कायद्याच्या चौकटीत राहून गुंतवणूक केली पाहिजे. ई-कॉमर्ससंबंधी कायद्यातील पळवाटांचा दुरुपयोग करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गोयल यांच्या या भूमिकेने कॉर्पोरेट क्षेत्रात नाराजी दिसून आली. त्यानंतर गोयल यांनी खुलासा करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com