‘साइड पॉकेटिंग’ नक्की कशासाठी? 

‘साइड पॉकेटिंग’ नक्की कशासाठी? 

म्युच्युअल फंडाच्या डेट योजनेत गुंतवणूकदारांकडून जी रक्कम गोळा केली जाते, ती विविध कंपन्यांना कर्जरुपाने (रोखे व अन्य स्वरूपात) दिली जाते. अशा रोख्यांवर मिळणारे व्याज हे संबंधित योजनेचे उत्पन्न असते. पण जर का कंपनीला दिलेले कर्ज किंवा व्याज मुदतीत मिळाले नाही, तर त्या रोख्यांचे ‘रेटिंग’ घसरते आणि त्याचा बाजारभावही घसरतो. ‘डिफॉल्ट’ झाल्यामुळे रोख्यांचे मूल्य कमी केले जाते आणि अशा रोख्यांचा हिस्सा ‘साइड पॉकेटिंग’ करून मूळ योजनेतून बाजूला काढला जातो. पण ‘साइड पॉकेटिंग’चा हा खटाटोप नक्की कशासाठी केला जातो, हे समजून घेतले पाहिजे. 

‘डेट फंडात तोटा होत नाही, असे मी ऐकले होते. पण आज तर मी केलेल्या डेट योजनेची ‘एनएव्ही’ तब्बल पाच टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. अहो, इक्विटी योजनेतसुद्धा कधी एका दिवसात एवढी ‘एनएव्ही’ कमी झाल्याचे मला आठवत नाही. मग हा तोटा कसा काय झाला?’... आमच्या शेजारच्या नानाकाकांनी सकाळी सकाळीच म्युच्युअल फंडाचे स्टेटमेंट दाखवत मला प्रश्‍न केला. नानाकाकांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मलाही थोडे आश्‍चर्यच वाटले. पण जेव्हा मी त्यांचे स्टेटमेंट बघितले, तेव्हा कशामुळे ‘एनएव्ही’ कमी झाली, हे लक्षात आले. 

‘नानाकाका, अहो हा तोटा नाही. तुम्ही स्टेटमेंट नीट बघितले, की तुमच्याही लक्षात येईल, की पाच टक्‍क्‍यांनी ‘एनएव्ही’ जरी कमी झाली असली तरी अजून जास्त युनिट्‌स तुम्हाला दिली आहेत. त्यामुळे या योजनेत असलेली तुमची एकूण रक्कम तीच राहिली आहे...’ मी उत्तर दिले; पण नानाकाकांचे समाधान झाले नव्हते. त्यांनी परत स्टेटमेंट बघितले.

‘हो. आधी माझी जेवढी युनिट्‌स होती, तेवढीच नवी युनिट्‌स आधीच्या ‘एनएव्ही’च्या पाच टक्के ‘एनएव्ही’ने दिली आहेत. दोन्ही एकत्र केले तर मग मला तोटा आहे, असे दिसत नाही. पण हे असे कशाला केले आहे?’ ‘याला ‘साइड पॉकेटिंग’ म्हणतात. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या १०० रुपयांतील ५ रुपये काढून तुमच्याच दुसऱ्या खिशात ठेवले आहेत, असे समजा. हे तुमच्या म्हणजे गुंतवणूकदारांच्या हितासाठी केले आहे. तुम्हाला माहिती आहे, की म्युच्युअल फंडाच्या डेट योजनेत गुंतवणूकदारांकडून जी रक्कम गोळा केली जाते, ती विविध कंपन्यांना कर्जरुपाने (रोखे व अन्य स्वरूपात) दिली जाते. रोख्यांवर मिळणारे व्याज हे या योजनेचे उत्पन्न असते. त्याबरोबरीने डेट योजना रोखे बाजारात ट्रेड होणारे कॉर्पोरेट बाँड्‌सची चालू बाजारभावाला खरेदी-विक्री करीत असते. या रोख्यांचे कंपनीच्या आर्थिक क्षमतेनुसार ‘रेटिंग’ केलेले असते. पण जर का कंपनीला दिलेले कर्ज किंवा व्याज मुदतीत मिळाले नाही, तर त्या रोख्यांचे ‘रेटिंग’ घसरते आणि त्याचा बाजारभावही घसरतो. ‘सेबी’च्या नियमानुसार योजनेच्या ‘एनएव्ही’चा हिशेब करताना अशा बुडित कंपनीच्या रोख्यांचे मूल्य २५ ते १०० टक्के कमी करावे लागते. याला ‘हेअरकट’ घेणे असे म्हणतात.’

‘म्हणजे या ‘हेअरकट’मुळे आमचाही खिसा कापला जातो की...’ नानाकाका वैतागून म्हणाले.

‘हो ना. हीच डेट योजनेची ‘क्रेडिट रिस्क’ असते. त्यामुळेच फक्त सरकारी जी-सेक रोखे असलेल्याच डेट योजनांना क्रेडिट रिस्क नसते.’

‘पण त्यांना ‘इंटरेस्ट रिस्क’ असतेच ना. पण या ‘साइड पॉकेटिंग’चा उद्देश काय? आणि त्या युनिट्‌सचे पुढे काय होते?’

‘रोख्यांवर ‘डिफॉल्ट’ झाल्यामुळे रोख्यांचे मूल्य कमी केले जाते आणि अशा रोख्यांचा हिस्सा ‘साइड पॉकेटिंग’ करून मूळ योजनेतून बाजूला काढला जातो. उदा. तुमच्या योजनेतील १ कोटी रुपयांतील ५ लाख रुपयांचे रोखे हे बुडित झाल्यामुळे ‘साइड पॉकेट’ करून बाजूला काढले आहेत. म्हणजे सुरवातीची १ लाख युनिट्‌स ही १०० रुपये ‘एनएव्ही’ला होती. ‘साइड पॉकेट’ केल्यानंतर १ लाख युनिट्‌स रु. ९५ ‘एनएव्ही’ला आणि १ लाख युनिट्‌स ५ रुपये ‘एनएव्ही’ला, असे केले आहे.’

‘हो, तसेच झालेले दिसत आहे. पण हे कशासाठी केले आहे, ते अजून लक्षात आले नाही.’ 

‘जरी बुडित रोख्यांचे मूल्य घटवून त्याचे ‘साइड पॉकेटिंग’ केले असले तरी या रोख्यांवरील व्याज आणि मुद्दल भविष्यकाळात वसूल होण्याची शक्‍यता आहे. यामुळे सध्याच्या गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये म्हणून हा ‘साइड पॉकेटिंग’चा खटाटोप केला जातो.’

‘आता आले लक्षात माझ्या. म्हणजे बुडित रोख्यांच्या परिणामामुळे ‘एनएव्ही’ कमी झाल्यावर जे गुंतवणूकदार युनिट्‌स विकतात, त्यांचे नुकसान होते. कारण नंतर जेव्हा त्या रोख्यांची वसुली होते, तेव्हा यांना त्याचा फायदा त्यांनी विक्री केल्यामुळे मिळणार नाही.’

‘बरोबर. शिवाय ‘एनएव्ही’ कमी झाल्यानंतर जे नव्याने खरेदी करतील, त्यांना या रोख्यांच्या वसुलीचा उगाचच फायदा होईल. असे होऊ नये म्हणून ज्या दिवशी रोख्यांवर बुडित होण्याचा (क्रेडिट इव्हेंट) म्हणजे ‘डिफॉल्ट’चा शिक्का बसतो, त्यादिवशी ती युनिट्‌स वेगळी काढली जातात. या ‘साइड पॉकेट’ केलेल्या युनिट्‌सची विक्री करता येत नाही आणि जेव्हा वसुली होते, तेव्हाच ती रक्कम परत केली जाते. उर्वरित योजनेतील खरेदी-विक्रीचे व्यवहार नेहमीप्रमाणे पुढे चालू राहतात.’

‘आत्ता मला कळले, की माझी युनिट्‌स माझ्या बाजूच्या खिशात आहेत आणि नंतर मला त्याची रक्कम मिळणार आहे. पण असे धक्के बसू नयेत म्हणून काही उपाय आहे का?’

‘हो, आहे ना. उत्तम ‘रेटिंग’ (एएए) असलेले रोखे असलेल्या योजनेची निवड करावी. २०१८ मध्ये आयएल अँड एफएस ही मोठी ‘एनबीएफसी’ बुडित झाल्यानंतर दिवाण हाउसिंग, झी आणि एस्सेल ग्रुप, रिलायन्स होम अशा अनेक कंपन्या (वेळेवर व्याज वा मुद्दल न दिल्यामुळे) घसरल्या आणि ‘क्रेडिट रिस्क’ योजनांना फटका बसला. तसेच फक्त मागील परतावा हा निकष मानून डेट योजनेची निवड करू नये आणि ज्याला जास्त जोखीम-जास्त परतावा हे सूत्र मान्य आहे, त्यानेच ‘क्रेडिट रिस्क’ प्रकारातील डेट योजनांची निवड करावी.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com