फिनटेक : ‘यूपीआय’ खरोखरच भन्नाट!

अतुल कहाते
Monday, 11 January 2021

‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) या तंत्रज्ञानाविषयी अलीकडे बरीच चर्चा सुरू असते. इतर कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारचे तंत्रज्ञान आलेले नाही. या पार्श्वभूमीवर ‘यूपीआय’चे वेगळेपण आणि महत्त्व अधोरेखित केलेच पाहिजे. 

‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) या तंत्रज्ञानाविषयी अलीकडे बरीच चर्चा सुरू असते. इतर कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारचे तंत्रज्ञान आलेले नाही. या पार्श्वभूमीवर ‘यूपीआय’चे वेगळेपण आणि महत्त्व अधोरेखित केलेच पाहिजे. 

‘यूपीआय’ची सोपी व्याख्या म्हणजे, भारतामधील कोणत्याही बॅंकेत आपले खाते असेल, तर इतर कोणत्याही बॅंकेच्या कोणाच्याही खात्यात आपण लीलया पैसे क्षणार्धात पाठवू शकतो. हे शक्य करून देणारे तंत्रज्ञान. अर्थात, येथे काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. भारतामधील सर्वच्या सर्व बॅंका या यूपीआय तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट झालेल्या नाहीत. काही बॅंका; खास करून छोट्या किंवा अतिग्रामीण भागातील स्थानिक बॅंका ‘यूपीआय’मध्ये अजून नाहीत.

तसेच, यूपीआय तंत्रज्ञानाचा वापर करून एका वेळी तसेच एका दिवसात आपण किती पैसे पाठवू शकतो, यावरही बंधने आहेत. अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करूनसुद्धा आपण यूपीआय तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी असल्याचे खात्रीलायकरीत्या सांगू शकतो. भारताच्या रिझर्व्ह बॅंकेच्या देखरेखीखाली तयार झालेले हे तंत्रज्ञान खरोखरच भन्नाट आहे. आता ते वापरायचे कसे, याकडे वळू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यूपीआय तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला ‘भीम’, ‘फोन पे’, ‘गुगल पे’, ‘ॲमॅझॉन पे’ यांच्यासारख्या एखाद्या ‘ॲप’चा वापर करावा लागतो. असे ‘ॲप’ आपल्या स्मार्ट फोनवर डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकाशी आपली बॅंक खाती आपण आधी जोडलेली असतील ती सर्व बॅंक खाती आपल्याला या ‘ॲप’मध्ये दिसायला लागतात. आपण आपल्या या खात्यांमधून इतरांना पैसे पाठवणे, इतरांकडून ते स्वीकारणे, बिले भरणे, अशी अनेक कामे आता या ‘ॲप’द्वारेच करू शकतो. त्यासाठी बॅंकेत जाण्याची गरज भासणे तर दूर; आपल्याला आपल्या बॅंकेच्या वेबसाइटवर लॉग-इनसुद्धा करावे लागत नाही! या ‘ॲप’मधूनच सगळे विलक्षण वेगाने करता येते. यासाठी हे ‘ॲप’ आपल्याला ई-मेल आयडीसारखा एक आयडी किंवा पत्ता देते.

चीनला भारत देणार टक्कर; खेळण्यांच्या पहिल्या क्लस्टरची कर्नाटकमध्ये पायाभरणी

याखेरीस आपण ऑनलाइन शॉपिंग केल्यावर त्यासाठीचे बिल भरताना ‘यूपीआय’चा पर्याय स्वीकारला तर हे बिल आपण पुन्हा याच ‘ॲप’द्वारे भरू शकतो. अर्थातच, पैसे आपल्या बॅंक खात्यातून वळते केले जातात. कारण, आपले यूपीआय ॲप आपल्या बॅंक खात्याला जोडलेले असते. हे सर्व सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या यूपीआय ॲपला आपण ‘पिन’ ठेवू शकतो. म्हणजे, आपला फोन दुसऱ्‍या कोणाकडे असताना किंवा हरविल्यावर वा चोरीला गेल्यावर आपली बॅंक खाती सुरक्षित राहतात.

अर्थात, ‘यूपीआय’ वापरत असताना काही बाबतींत काळजी घेणे गरजेचे असते. त्याविषयी पुढच्या वेळी...

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Kahate Writes about UPI