लक्ष्मी विलास बँक : ठेवीदारांना दिलासा, भागधारकांना भोपळा!

अतुल सुळे
Monday, 23 November 2020

बँकेचे डीबीएस बँकेबरोबर विलिनीकरण करण्यात येणार आहे. लक्ष्मी विलास बँकेचे भागभांडवल व गंगाजळी पूर्णपणे ‘राइट ऑफ’ करण्यात येणार आहे; म्हणजेच भागधारकांच्या हाती काहीच लागणार नाही.

यंदाची दिवाळी संपते न संपते, तोच केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने चेन्नईमध्ये मुख्यालय असलेल्या ९४ वर्षे जुन्या लक्ष्मी विलास बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्याचे जाहीर केले. हे निर्बंध १६ डिसेंबर २०२० पर्यंत असतील व या महिनाभरात ग्राहकांना आपल्या सर्व खात्यातून मिळून रु. २५,००० (जास्तीत जास्त) काढता येतील. त्याचबरोबर वैद्यकीय आणीबाणी, उच्च शिक्षण व लग्नप्रसंगासाठी जास्तीत जास्त रु. पाच लाख काढता येतील, असा दिलासा ठेवीदारांना देण्यात आला. ही बँक वाचविण्यासाठी एक योजना बनविण्यात आली असून, त्या योजनेनुसार या बँकेचे डीबीएस बँकेबरोबर विलिनीकरण करण्यात येणार आहे. लक्ष्मी विलास बँकेचे भागभांडवल व गंगाजळी पूर्णपणे ‘राइट ऑफ’ करण्यात येणार आहे; म्हणजेच भागधारकांच्या हाती काहीच लागणार नाही.

NEFT नंतर आता RTGS च्या नियमातही बदल; नवी सुविधा फायद्याची

लक्ष्मी विलास बँक कशी आहे?
१९२६ मध्ये करुरमधील सात उद्योजकांनी मिळून या बँकेची स्थापना केली. यात व्ही. एस. एन. रामलिंग चेट्टीयार यांनी पुढाकार घेतला. प्रामुख्याने व्यापारी, छोटे उद्योजक, शेतकऱ्यांना ही बँक कर्जपुरवठा करीत असे. त्यानंतर तमिळनाडू राज्याबाहेरसुद्धा या बँकेचा विस्तार करण्यात आला. सध्या १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात या बँकेच्या ५६३ शाखा व ९१८ एटीएम कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ३० शाखा महाराष्ट्रात आहेत. मुंबईत २० शाखा आहेत. या बँकेच्या ठेवी सुमारे रु. २०,००० कोटी आणि कर्जे रु. १७,००० रुपये आहेत. ४१०० कर्मचारी आणि २० लाख ठेवीदार आहेत.

का अडचणीत आली?
जाणकारांच्या मते, या बँकेने जेव्हापासून आपले लक्ष छोटे व्यापारी, उद्योजकांऐवजी मोठ्या कंपन्यांकडे वळविले, तेव्हापासून या बँकेच्या अडचणींना सुरुवात झाली. रॅनबॅक्षी व फोर्टिस हेल्थकेअरचे पूर्वीचे प्रवर्तकबंधू मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांना या बँकेने रु. ७९४ कोटींच्या मुदत ठेवीवर रु. ७२० कोटींचे कर्ज दिले, जे वसूल न झाल्याने बँकेने मुदत ठेव वर्ग केली. या व्यवहाराला रेलिगेअर इंटरप्राइजेस या कंपनीची उपकंपनी रेलिगेअर फिन्व्हेस्टने हरकत घेऊन बँकेविरुद्ध दावा दाखल केला. बँकेची ढोबळ बुडीत कर्जे २०१८ मध्ये १० टक्के होती, ती २०१९ मध्ये १५.३ टक्के, तर २०२० मध्ये २५.४ टक्के झाली. सततच्या तोट्यामुळे भागभांडवल साफ झाले. रिझर्व्ह बँकेने या बँकेला ‘प्रॉम्प्ट करेक्टिव ॲक्शन’खाली (पीसीए) आणले. भांडवल मिळविण्यासाठी बँकेने इंडिया बुल्स फायनान्स, क्लीक्स कॅपिटल, पंजाब नॅशनल बँकेबरोबर बोलणी केली, पण ती फिस्कटली.

हेल्मेट न वापरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द

डीबीएस बँक इंडिया कशी आहे?
कोणतेच प्रस्ताव यशस्वी न झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँकेत विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. डीबीएस बँक इंडिया ही डीबीएस बॅंक, सिंगापूरची उपकंपनी आहे. या बँकेचे पूर्वीचे नाव ‘डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर’ असे होते. या बँकेने गेली अनेक वर्षे ‘सेफेस्ट बॅंक इन एशिया’ हे बिरुद मिरवले आहे. विलिनीकरणाची योजना मंजूर होताच मुख्य कंपनी ही उपकंपनीत रु. २५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे लक्ष्मी विलास बँक सावरेल. तसेच, लक्ष्मी विलास बँकेचे भागभांडवल व गंगाजळी पूर्णपणे ‘राइट ऑफ’ करणार आहेत; म्हणजेच भागधारकांच्या हाती काहीच लागणार नाही.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांनी काय करावे?
रिझर्व्ह बँकेने व प्रशासकाने ठेवीदारांना आश्वस्त केले आहे, की तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत. त्यामुळे घाबरून ठेवी काढू नयेत.

आवश्यकता असल्यास  रु. २५,००० पर्यंतची रक्कम काढावी.

वैद्यकीय आणीबाणी, उच्च शिक्षण, लग्नप्रसंग असल्यास रु. पाच लाखांपर्यंतची रक्कम काढावी.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एसआयपी, ईएमआयची मोजणी या रु. २५,००० मध्येच होणार आहे.
या बँकेतून कर्ज घेतले असल्यास, हप्तेवसुली चालूच राहणार आहे.

या बँकेत पगार जमा होत असल्यास, आपल्या कंपनीला आता दुसऱ्या बँकेत पगार जमा करण्यास सांगावे.

लक्ष्मी विलास बँक व येस बँकेप्रमाणेच अडचणीत असलेल्या इतर बँकांबाबतही रिझर्व्ह बँकेने लवकरात लवकर तोडगा काढावा.

(लेखक बँकिंग क्षेत्रातील जाणकार आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul sule article about laxmi vilas bank Consolation to depositors