'रिस्क है तो इश्क है'

भूषण गोडबोले
Monday, 23 November 2020

सध्या शेअर बाजार महाग व्हॅल्युएशला असल्याने जोखीम वाढली आहे. यामुळे कोणत्याही कंपन्याची शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यावर बाजारात पडझड झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ४३,८८२ अंशावर, तर निफ्टी १२,८५९ अंशावर बंद झाला. सप्ताहाअखेरीस शेअर बाजाराने तेजी दर्शविली; मात्र अमेरिकी शेअर बाजाराने घसरण दर्शविल्याने नव्या आठवड्याच्या सुरुवातीस संमिश्र संकेत मिळत आहेत. मध्यम अवधीच्या आलेखानुसार ‘सेन्सेक्स’साठी ३९,२४०, तर ‘निफ्टी’साठी ११,५३५ अंशांची महत्त्वाची आधार पातळी आहे. बाजार नवनवे उच्चांक गाठत असला तरी कंपन्यांच्या मिळकतीचा विचार करता बाजार महाग झाला आहे. अशा वेळेस ट्रेडिंग करताना पोर्टफोलिओमध्ये कोणत्या शेअरची निवड करावी, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. 

हेल्मेट न वापरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द

सर्वप्रथम बाजार महाग असल्याने मर्यादित भांडलावरच जोखीम स्वीकारावी. बाजारात तेजीचे संकेत मिळाल्यास ट्रेडिंगसाठी आलेखानुसार तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरची निवड करण्यास प्राधान्य द्यावे आणि बाजाराची; तसेच निवडलेल्या शेअरची दिशा कधीही बदलू शकते, हे लक्षात घेऊन ‘स्टॉपलॉस’चा वापर करावा. शेअरची निवड करताना, आलेखानुसार तेजी दर्शवीत असलेल्या कंपन्या फंडामेंटल्सनुसार देखील सक्षम असल्यास टेक्नो-फंडामेंटल दृष्टिकोन ठेवून दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्ये केलेली खरेदी फायदेशीर ठरू शकते. आलेखानुसार, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, टायटन, अस्ट्रल पॉली टेक आदी कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दर्शवीत आहेत. 

टप्प्याटप्प्याने दीर्घकालीन गुंतवणूक
प्रामुख्याने घड्याळ; तसेच दागिने आदी क्षेत्रात अग्रणी असलेल्या टाटा समूहाच्या टायटन या कंपनीच्या शेअरचा आलेख तेजीचा कल दर्शवीत आहे. लॉकडाउन संपल्यानंतर दसरा ते दिवाळी या सणासुदीच्या काळात कंपनीच्या व्यवसायात उत्तम प्रगती होत आहे. टायटन कंपनीने भारताबाहेर व्यवसायवृद्धीसाठी दुबईमध्ये नुकतेच ‘तनिष्क’चे नवे दालन सुरू केले आहे. आगामी काळात रु. १३८९ या पातळीच्या वर बंद भाव दिल्यास या कंपनीच्या शेअरमध्ये मध्यम अवधीमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते. आगामी आठवड्यात बाजाराने; तसेच टायटनच्या शेअरनेदेखील तेजीचा कल दर्शविल्यास रु. ११५३ या पातळीचा ‘स्टॉपलॉस’ ठेवून मर्यादित भांडवलावर मर्यादित जोखीम स्वीकारून मध्यम अवधीसाठी खरेदीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकते. सध्या शेअर बाजारात टप्प्याटप्प्याने दीर्घकालीन गुंतवणूक करतानादेखील पोर्टफोलिओमध्ये नेस्ले इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, टायटन, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन रेल्वे केटरींग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आदी कंपन्यांच्या शेअरची निवड करणे योग्य ठरू शकेल.

NEFT नंतर आता RTGS च्या नियमातही बदल; नवी सुविधा फायद्याची

‘बचेंगे तो और भी लढेंगे’
सध्या शेअर बाजार महाग व्हॅल्युएशला असल्याने जोखीम वाढली आहे. यामुळे कोणत्याही कंपन्याची शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यावर बाजारात पडझड झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. अशा वेळेस ‘रिस्क है तो, इश्क है’ म्हणत कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक करण्याऐवजी मर्यादितच जोखीम स्वीकारणे योग्य ठरू शकेल. कारण, ‘रिस्क है तो इश्क है, मगर मार्केट में बचेंगे तो और लढेंगे’ हेही लक्षात ठेवावे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

(डिस्क्लेमर ः लेखक सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत. वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole write article share market