शेअर मार्केट : शेअर बाजारात बिरबलाची रणनीती

Share Market
Share Market

भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत भक्कम झालेला रुपया; तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात ‘टीसीएस’चे उत्तम अपेक्षित तिमाही निकाल या सर्वांच्या जोरावर तेजीची घोडदौड चालू ठेवत गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ४८,७८२ अंशांवर, तसेच निफ्टी १४,३४७ अंशांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात ‘टीसीएस’ने दशकातील सर्वोत्तम तिमाही निकाल जाहीर केला आहे. येत्या आठवड्यात आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक आदी कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. तसेच, आठवड्याच्या शेवटी एचडीएफसी बँकेचे निकाल जाहीर होतील.

ऑटो क्षेत्रात तेजीचे संकेत
आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४४,९२३ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ऑटो क्षेत्रातील मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, आयशर मोटर आदी अनेक कंपन्यांनी तसेच वाहननिर्मिती क्षेत्राशी निगडित अमारा राजा बॅटरी, बाळकृष्ण इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या शेअरने गेल्या आठवड्यात जोरदार तेजी दर्शविली. त्यामुळे ऑटो कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑटो इंडेक्सने गेल्या आठवड्यात ९५७९ या पातळीच्या वर ९७४१ पातळीला बंद भाव देत मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘बाळकृष्ण इंडस्ट्रीज’मध्ये तेजी
टायरनिर्मिती क्षेत्रातील बाळकृष्ण इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरने रु. १७२० या अडथळा पातळीच्या वर रु. १७२१ बंद भाव दिला आहे. त्यामुळे या शेअरचा भाव रु. १५००  या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये या शेअरमध्ये आणखी भाववाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, बाजार महाग असताना देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर चढ-उतार दर्शविणाऱ्या तसेच जास्त चंचलता दर्शविणाऱ्या वाहन क्षेत्रातील कंपन्यांची ट्रेडिंग अथवा गुंतवणुकीसाठी निवड करताना मर्यादितच भांडवलावर धोका स्वीकारणे योग्य ठरेल.

आयुर्विमा क्षेत्रातही तेजी
आयुर्विमा क्षेत्रातील एसबीआय लाइफ तसेच एचडीएफसी लाइफ आदी कंपन्यांचे शेअरदेखील तेजीचा कल दर्शवीत आहेत. हेअर ऑइल विक्रीतील अग्रगण्य कंपनी मॅरिको या कंपनीच्या शेअरने तेजीचा कल दर्शवीत नवा उच्चांक गाठला आहे. टप्प्याटप्प्याने दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

बिरबलाच्या रणनीतीचा वापर 
एकदा अकबर बादशाहने बिरबलाला विचारले, ‘असे एकच वाक्य सांग, जे दुःखात ऐकल्यास धीर मिळेल आणि सुखात ऐकल्यास आपण सावध होऊ.’ यावर बिरबल म्हणाला, ‘ही वेळ पण निघून जाईल’. मात्र, सध्या बाजारात तेजीचे सुखावह वातावरण असताना बिरबलाच्या या वाक्याचे स्मरण केल्यास आपण सावध होऊन गुंतवणूक करताना टप्प्याटप्प्याने फंडामेंटली सक्षम कंपन्यांची निवड करून आणि मर्यादित धोका स्वीकारून बिरबलाच्या रणनीतीचे धोरण पाळणे हितावह ठरू शकेल.

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.
(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com