esakal | बॅंकिग क्षेत्रात तेजीचे संकेत 
sakal

बोलून बातमी शोधा

banking sector

ट्रेडिंग करताना किती व्यवहार बरोबर आले आणि किती चुकले, यापेक्षा जे व्यवहार बरोबर आले, तिथे किती पैसे मिळाले आणि जे व्यवहार चुकले तिथे किती नुकसान झाले, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते.

बॅंकिग क्षेत्रात तेजीचे संकेत 

sakal_logo
By
भूषण गोडबोले

पंतप्रधान जन धन योजनेने मागील आठवड्यात सहा वर्षे पूर्ण केली. या योजनेतील एकूण शिल्लक रक्कम 1.31 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. मागील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय बॅंकिंग व्यवस्था सक्षम असल्याचे वक्तव्य केले. तसेच आगामी काळात आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी गरज भासल्यास व्याजदरकपात व इतर धोरणांचा विचार केला जाईल, असेदेखील सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सार्वजनिक; तसेच खासगी बॅंकिंग क्षेत्रातील अनेक शेअरनी जोरदार तेजी दर्शविली. आलेखानुसार बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक "बॅंक निफ्टी'ने सात आठवडे मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात 23,211 अंशांच्या पातळीच्या वर 24,523 अंशाला भाव देऊन तेजीचे संकेत दिले. आलेखानुसार "बॅंक निफ्टी' 21,025 अंशांच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी तेजी दर्शवू शकेल. बॅंकिंग क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, फेडरल बॅंक आदी बॅंकांचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत. गेल्या आठवड्यात "सेन्सेक्‍स' 39,467, तसेच "निफ्टी' 11,647 अंशांना बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी तेजी येण्याची शक्‍यता 
ऍक्‍सिस बॅंकेच्या शेअरने 17 एप्रिल 2020 पासून 27 ऑगस्ट 2020 पर्यंत 485 ते 332 या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर मागील आठवड्यात शुक्रवारी 509 रुपयांना बंद भाव दिला. मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविणाऱ्या अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत त्याने दिले. ऍक्‍सिस बॅंकेच्या शेअरचा भाव 424 रु. या "स्टॉपलॉस' पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार दर्शवत आणखी वाढ दर्शवू शकतो. हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील एलआयसी हाउसिंग फायनान्स या कंपनीच्या शेअरनेदेखील एप्रिल महिन्यापासून 296 ते 219 या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात 296 या पातळीच्या वर 314 रुपयांवर बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले. आलेखानुसार एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या शेअरचा भाव 263 रु. या "स्टॉपलॉस' पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी तेजी दर्शवू शकेल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नुकसान टाळण्यासाठी "स्टॉपलॉस' 
मागील आठवड्याच्या अखेरीस अमेरिकी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने म्हणजेच "डाऊ जोन्स'ने शुक्रवारी 161 अंशांची तेजी दाखविली. यामुळे पुढील आठवड्याची सुरवात तेजीने होऊ शकते. आगामी आठवड्यात "निफ्टी'ने; तसेच तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअर्सनी तेजीचा कल दर्शविल्यास "स्टॉपलॉस'चा वापर करूनच ट्रेडिंग करणे हितावह ठरेल. ट्रेडिंग करताना किती व्यवहार बरोबर आले आणि किती चुकले, यापेक्षा जे व्यवहार बरोबर आले, तिथे किती पैसे मिळाले आणि जे व्यवहार चुकले तिथे किती नुकसान झाले, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते. "स्टॉपलॉस'चा वापर केल्याने नुकसान मर्यादित ठेवणे शक्‍य होऊ शकते. ट्रेडिंग करताना कितीही अभ्यास केला तरी अंदाज चुकू शकतात. निष्णात ट्रेडरदेखील म्हणतात, "इस मार्केट का ऐसा कोई सगा नही, जिसको मार्केटने ठगा नही!' यामुळे ट्रेडिंग करताना पैशाचे योग्य व्यवस्थापन आणि "स्टॉपलॉस'चा वापर करणे अत्यंत आवश्‍यक असते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मर्यादित भांडवलावरच खेळा! 
टेक्‍निकल ऍनालिसिसनुसार, शेअर बाजार जरी तेजीचा कल दर्शवत असला तरी फंडामेंटलचा विचार करता, बाजाराचा प्राईस अर्निंग (पीई) रेशो 32 पेक्षा जास्त म्हणजेच बाजार महाग आहे. यामुळे लॉंग टर्मसाठीची गुंतवणूक असो, की शॉर्ट टर्मसाठीचे ट्रेडिंग, शेअर बाजारात मर्यादितच भांडवल गुंतविणे योग्य ठरू शकेल. 

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून जाणकार गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्‍यक आहे. 

(लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)