"इन्व्हेस्ट ऑर ट्रेड... लेस बट वाईज!' 

earnings-of-companies
earnings-of-companies

मागील आठवड्यात एकूण 522 अंशांची घसरण दर्शवून "सेन्सेक्‍स' 37,606 अंशांना, तर "निफ्टी' 121 अंशांची घसरण दर्शवून 11,073 अंशांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील महत्त्वाचा अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक "डाऊ जोन्स' सप्ताहखेर 114 अंशांची तेजी दर्शवून 26,428 अंशांवर बंद झाला. ऍपल, ऍमेझॉन, फेसबुक, गूगल (अल्फाबेट) आदी कंपन्यांनी उत्तम तिमाही निकाल जाहीर केले. शुक्रवारी ऍपल कंपनीच्या शेअरने एकाच दिवसात 10 टक्के वाढ नोंदविली. एकंदरीत, पुढील आठवड्याच्या सुरवातीस आंतरराष्ट्रीय बाजारातून तेजीचे संकेत मिळत आहेत. फंडामेंटल्सनुसार, "निफ्टी' 30 "पीई'च्या देखील वर गेला आहे. आगामी कालावधीमध्ये बाजार स्वस्त होण्यासाठी एकतर किंमत (प्राईज) उतरली पाहिजे किंवा कंपन्यांची मिळकत (अर्निंग) वाढली पाहिजे. 

कंपन्या पुन्हा येतील प्रगतिपथावर 
आगामी काळात "लॉकडाउन'मुळे तिमाही निकालात "अर्निंग'मध्ये मोठी वाढ होणे अवघड आहे. मात्र, हळूहळू "अनलॉक'मुळे भविष्यात कंपन्या पुन्हा उत्तम प्रगती दाखवतील, या आशेवर बाजार वाढ दाखवत आहे. अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक देखील "पीई' रेशोनुसार 30 अंशांच्या वर आहे. "पीई व्हॅल्युएशन'नुसार अमेरिकी बाजार 3 टक्के परतावा दर्शवत आहे. मात्र, अमेरिकेत बॅंक ठेवीचे व्याजदर 3 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे "पीई रेशो'नुसार अमेरिकी शेअर बाजार 30 अंशांच्या वर असून देखील तेथील बॅंकव्याजदरापेक्षा जास्त परतावा देत असल्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहेत. 

धोका असुद्या मर्यादितच! 
अमेरिकी शेअर बाजार "पीई'नुसार आकर्षक असला तरी "मार्केट कॅप टू जीडीपी'चा विचार करता; त्याचप्रमाणे अमेरिकेतील "डेट (देशाचे एकूण कर्ज) टू जीडीपी'नुसार देखील बाजार महाग असल्याचे संकेत देत आहे. भारताचा विचार केल्यास, भारतीय शेअर बाजार "पीई'नुसार महाग असल्याचे लक्षात घेता यापुढील काळात "ट्रेडिंग' असो की "लॉंग टर्म'ची गुंतवणूक असो, मर्यादित भांडलावरच धोका स्वीकारणे योग्य ठरेल. आलेखानुसार 10,532 अंश ही "निफ्टी'ची,तर 35,877 अंश ही "सेन्सेक्‍स'ची महत्त्वाची पातळी आहे. 

तेजीकडे कल 
"निफ्टी' 10,532 अंश, तर "सेन्सेक्‍स' 35,877 अंश या पातळींच्या वर आहे, तोपर्यंत अल्पावधीच्या आलेखानुसार निर्देशांक तेजीचा कल दर्शवत आहे. यापूर्वीच्या लेखामध्ये नमूद केल्यानुसार आयटी क्षेत्राचा निर्देशांक तेजीचा कल दर्शवत आहे. इन्फोसिस, एचसीएल टेक, एल अँड टी इन्फोटेक या आयटी क्षेत्रातील कंपन्या तेजीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मागील आठवड्यात आयटी क्षेत्राबरोबरच फार्मा क्षेत्रातील कंपन्यांनी तेजीचा कल दर्शविला. 

फार्मा क्षेत्रातील व्यवहार फायदेशीर 
एप्रिल 2015 पासून मार्च 2020 पर्यंत मंदीचा कल दर्शविल्यानंतर मागील आठवड्यात आलेखानुसार, फार्मा इंडेक्‍सने 10,786 अंशांच्या वर बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे फार्मा इंडेक्‍स 9676 अंशांच्या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आलेखानुसार तेजीचा कल दर्शवत आहे. फार्मा क्षेत्रातील डॉ. रेड्डीज, सिप्ला, अजंठा फार्मा आदी अनेक कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत. अजंठा फार्मा हा शेअर 1329 रुपयांच्या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तो चढ-उतार दर्शवत मध्यम अवधीमध्ये आणखी वाढ दर्शविणे अपेक्षित आहे. आगामी आठवड्यात बाजाराने तेजीचे संकेत दिल्यास; तसेच तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअर्सनेदेखील तेजी दर्शविल्यास "स्टॉपलॉस' ठेवून या सेक्‍टरमधील शेअर्समध्ये तेजीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल. मात्र, बाजार महाग व्हॅल्युएशनला असल्याने मर्यादित भांडवलावर मर्यादितच धोका स्वीकारणे म्हणजेच "इन्व्हेस्ट ऑर ट्रेड... लेस बट वाईज' हा मंत्र लक्षात घेणे योग्य ठरेल. कारण बाजाराची दिशा कधीही बदलू शकते. 

(लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) 

पुणे 

महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com