शेअर बाजाराचा विक्रम; आता पुढे काय? 

मंदार जामसांडेकर
शनिवार, 27 मे 2017

आपण बाजार खाली येण्याची वाट पाहात बसलो, तर गुंतवणूक करण्यापासून वंचितच राहणार. त्यापेक्षा मी असा सल्ला देईन, की चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आपण थोडी-थोडी गुंतवणूक करायला हवी. भविष्यात 'जीएसटी'चा फायदा ज्या कंपन्यांना होणार आहे, त्या कंपन्यांना प्राधान्य दिल्यास उत्तमच.

शेअर बाजार आता नव्या उंचीवर पोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सर्वोच्च पातळीवर आहे. 'बँक निफ्टी'सुद्धा विक्रमी पातळीवर आहे. यामुळे अनेक नवे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. त्याचबरोबर बाजारामध्ये पडझड होण्याची म्हणजे 'करेक्‍शन' होण्याची भीतीसुद्धा सर्वांच्या मनात आहे. मलाही काही गुंतवणूकदार भेटले व त्यांनी काही प्रश्‍न विचारले, जे आता असंख्य गुंतवणूकदारांच्या मनात असणार आहेत. म्हणून या लेखाद्वारे 'सकाळ मनी'च्या वाचक व गुंतवणूकदारांना त्यांची उत्तरे....

प्रश्‍न: शेअर बाजार आता सर्वोच्च पातळीवर आहे, तो येथून आता खाली येऊ शकतो का? 
उत्तर:
या प्रश्‍नाचे उत्तर देताना असे म्हणेन, की तत्काळ ही गोष्ट घडण्याचे कारण दिसत नाही; परंतु स्वतंत्ररीत्या काही शेअरमध्ये हे घडू शकते. जे आपण गेल्या दोन महिन्यांमध्ये पाहिलेसुद्धा आहे व हे याच पद्धतीने पुढे घडणे अपेक्षित आहे. निर्देशांक हे साधारणतः सध्या आहेत, त्याच पातळीच्या थोडे वर-खाली होतील; पण खूप काही हालचाल होणार नाही. परंतु स्वतंत्र शेअरचा विचार करता, आपल्यासमोर बऱ्याच अशा कंपन्यांचे शेअर आहेत, जे त्यांच्या 'बिझनेस व्हॅल्युएशन'पेक्षा बरेच वाढले आहेत, त्यामुळे त्यांच्यात 'प्रॉफिट बुकिंग' दिसून येऊ शकते.

प्रश्‍न: मला शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे. परंतु, त्यासाठी मी बाजार थोडा खाली येण्याची वाट पाहायला हवी का? 
उत्तर:
जर आपण बाजार खाली येण्याची वाट पाहात बसलो, तर गुंतवणूक करण्यापासून वंचितच राहणार. त्यापेक्षा मी असा सल्ला देईन, की चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आपण थोडी-थोडी गुंतवणूक करायला हवी. भविष्यात 'जीएसटी'चा फायदा ज्या कंपन्यांना होणार आहे, त्या कंपन्यांना प्राधान्य दिल्यास उत्तमच. अशा प्रकारची गुंतवणूक किमान 1-2 वर्षांच्या दृष्टिकोनातून करण्यास हरकत नाही. आपल्या गुंतवणुकीच्या 25 टक्के रक्कम ही अशा शेअरमध्ये केल्यास जोखीम (रिस्क) घेण्यास मदत होईल.

प्रश्‍न: गुंतवणूक करण्यापूर्वी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे?
उत्तर:
1) जर आपली गुंतवणुकीची रक्कम ही दोन लाखांपेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड किंवा 'एसआयपी'च्या माध्यमातून करावी. 2) जर गुंतवणूक दोन लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यातील अर्धा भाग हा शेअरमध्ये व राहिलेला भाग क्रमाने म्युच्युअल फंड आणि 'एसआयपी'मध्ये करावा. यामुळे बचत, पैशांची वाढ होईल आणि जोखीम कमी होण्यास मदत होईल व येणाऱ्या संधीचा फायदापण घेता येईल. कारण opportunities do not have a habbit of sending an sms before they come.

प्रश्‍न: शेअर बाजारात तेजी चालू राहण्याची कारणे काय आहेत?
उत्तर:
व्याजदर सातत्याने खाली येत आहेत, त्यामुळे पारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग अतिशय कमी परतावा देत आहेत. वाढती जागरूकता व पारदर्शकता यामुळे शेअर बाजार व म्युच्युअल फंड याकडे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून बघितले जात आहे. तसेच, शेअर व म्युच्युअल फंडामधील एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी केलेली गुंतवणूक ही करमुक्त आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे, की जो 6.5 टक्के दराने प्रगती करीत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे देशांतर्गत मागणी मोठी आहे. त्यातच लवकरच 'जीएसटी' लागू होणार आहे, जेणेकरून 'लॉजिस्टिक्‍स' एकाच कराच्या अंतर्गत येऊन ही यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत होईल. वरील सर्व बाबींचा विचार करता, देशांतर्गत; तसेच परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवतील, त्यामुळे भविष्यात तेजीला बळ मिळण्याची शक्‍यता वाटते.

ताज्या बातम्याः

Web Title: Bombay stock market news analysis in Marathi share market