सक्सेस स्टोरी : गरज बनली उद्योगाची जननी!

सुवर्णा येनपुरे-कामठे
Monday, 1 February 2021

कंपनीची कार्यालये पाच शहरांमध्ये असून, तेथे तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक बेडची सुविधा त्यांच्याकडे असून, त्यांना हा आकडा काही लाखांवर न्यायचा आहे.

फिरायला जाणे, हा प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. अशावेळी पहिले डोळ्यासमोर चित्र येते ते, प्रवास आणि प्रवासातील मजा! पण फिरायला जाताना महत्त्वाचा प्रश्‍न असतो, की तिथे गेल्यावर राहायचे कुठे? याच प्रश्‍नावर उत्तर म्हणून सुरू झाले बंगळूरस्थित ‘झोलो स्टेज’ हा स्टार्टअप उद्योग! 

हा उद्योग ‘हिट’ ठरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी; तसेच विद्यार्थ्यांसाठीही खाण्याबरोबरच राहण्याचे पर्याय शोधून देणे. या व्यवसायाची स्थापना करणारे डॉ. निखिल सिक्री हे पेशाने डॉक्टर आहेत. 

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

सिक्री यांचा जन्म पंजाबमधील फरीदपूर येथे झाला. त्यांचे आई व वडील दोघेही डॉक्टर असल्याने, सिक्री यांनाही डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे सिक्री यांनी २००७  मध्ये दिल्लीतील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट  ऑफ मेडिकल सायन्सेस’मधून (एम्स) ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सिंगापूरमध्ये डॉक्टर म्हणून काम करायला सुरवात केली. परंतु, काही काळानंतर ‘व्यवस्थापना’चे शिक्षण घेण्यासाठी पुन्हा भारतात परतत, हैदराबादमधील ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये प्रवेश घेतला.

पुढे त्यांनी बड्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरवात केली. तिथे त्यांची भेट स्नेहा चौधरी यांच्याशी झाली. पुढे स्नेहा या खऱ्या आयुष्यातील जोडीदार व ‘झोलो स्टेज’च्या सह-संस्थापिका बनल्या. तसेच त्यांचा भाऊ अखिल सिक्री हा या व्यवसायात येत सह-संस्थापक झाला. २०१४-१५ मध्ये शिक्षण क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणून व्यवसाय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ‘बिझनेस मॉडेल’अभावी हा व्यवसाय फार तग धरू शकला नाही. त्यानंतर काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी विचार केला.

दरम्यान, स्नेहा यांची बहिण कामानिमित्त बंगळूरला राहायला येणार होती. त्यामुळे तिच्या राहण्याची योग्य व्यवस्था करण्याची जबाबदारी स्नेहा यांच्यावर असल्याने, त्या चांगली राहण्याची व्यवस्था शोधू लागल्या. ते शोधत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या प्रसंगातूनच धडा घेत, त्यांनी २०१५ मध्ये ‘झोलो स्टेज’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे इतर ठिकाणी फिरायला जाणाऱ्या, विद्यार्थ्यांना; तसेच कामानिमित्ताने जाणाऱ्यांसाठी राहण्याची व खाण्याची व्यवस्था परवडणाऱ्या किमतीत करून दिली जाते. 

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

‘झोलो स्टेज’द्वारे बिल्डरकडून रेसिडेन्शिअल बिल्डिंग भाडेतत्त्वावर घेतली जाते. त्यानंतर तिथे राहणाऱ्या लोकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. व्यवसाय सुरू करताना कोणता विचार डोक्यात होता, असे विचारले असता डॉ. सिक्री म्हणतात, ‘लोकांची गरज आपण ओळखली पाहिजे. व्यवसायात लवकर यश मिळविण्यासाठी लोकांची गरज ओळखता आली पाहिजे. तसेच लोकांच्या कोणत्या अडचणी सोडविल्या, की लोक आपल्याला पैसे देऊ शकतात याचाही विचार केला पाहिजे.’

आतापर्यंत, त्यांच्या कंपनीची कार्यालये पाच शहरांमध्ये असून, तेथे तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक बेडची सुविधा त्यांच्याकडे असून, त्यांना हा आकडा काही लाखांवर न्यायचा आहे. सध्या कंपनीचा महसूल ३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Success Story article Zolo stage startup industry Dr. Nikhil Sikri Sneha Chaudhary