‘ईएसजी इन्व्हेस्टिंग’चा विचार केलाय?

ESG-Investment
ESG-Investment

जेव्हा गुंतवणुकीची वेळ येते, तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या आवडीच्या कंपन्यांचे मूल्यमापन आर्थिक निकषांसोबतच काही विशिष्ट बिगरआर्थिक निकषांवरही करणे आवश्यक आहे. बिगरआर्थिक निकषांमध्ये ईएसजी (इन्व्हॉर्न्मेंट एम्पथी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स) म्हणजेच पर्यावरणाप्रती संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी व कंपनी प्रशासन या मुद्द्यांपासून सुरुवात करणे सयुक्तिक आहे.

दीर्घकाळ ‘ईएसजी’चे पालन करत राहिलेली कोणतीही कंपनी शाश्वत कंपनी म्हणून विकसित होणार, हे निश्चित. म्हणूनच, ‘ईएसजी’मधील गुंतवणुकीला शाश्वत गुंतवणूक, असेही म्हटले जाते.  

भारतातील सर्व नोंदणीकृत कंपन्या या तीन निकषांवर कसे काम करीत आहेत, याचा पाठपुरावा करणे सर्वसामान्य माणसासाठी खूपच कठीण असते. मात्र, आपण या मर्यादेवर म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या ‘ईएसजी फंडा’मध्ये पैसे गुंतवून मात करू शकतो. कोटक म्युच्युअल फंडाने नुकताच ‘ईएसजी फंड’ बाजारात विक्रीसाठी आणला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ईएसजी फंडा’च्या पोर्टफोलिओमध्ये आघाडीच्या साधारणपणे एक हजार नोंदणीकृत कंपन्यांचा समावेश असेल. ज्या कंपन्यांचे व्यवसाय सामाजिक दृष्टिकोनातून घातक समजले जातात; उदाहरणार्थ तंबाखू किंवा मद्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, अशा कंपन्यांना यातून वगळले जाते. त्यानंतर उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांना किंवा पाण्याचा अतिवापर करणाऱ्या कंपन्यांना; उदाहरणार्थ बॉटलिंग प्लांट, यांना यात नकारात्मक मूल्य दिले जाते किंवा पूर्णपणे वगळून टाकले जाते. तेव्हा यापुढे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ‘ईएसजी फंडा’ची संकल्पना विचारात घेतली, तर सामाजिक जाणिवेचे भानही राखले जाईल. 

‘ईएसजी’ गुंतवणूक म्हणजे काय?
1) पर्यावरणाप्रती संवेदनशीलता (एन्व्हॉर्न्मेंट एम्पथी) -

हिमनद्या वितळणे, वनांच्या आच्छादनात होत चाललेली घट, प्रदूषण, जगभरातील सरासरी तापमानांत होत चाललेली वाढ, ही सगळी जागतिक तापमानवाढीची लक्षणे आहेत. अर्थात, अद्याप सर्व काही गमावलेले नाही. अपारंपरिक ऊर्जेचा वापर, हिरवाईचे आच्छादन वाढविणे, कचऱ्याचे अधिक चांगले व्यवस्थापन आणि प्रदूषणावर उपाय, अशा मार्गांद्वारे पर्यावरणाचे रक्षण करता येऊ शकते. अशा काही गोष्टींसाठी कंपन्या काम करीत असतात.

2) सामाजिक जबाबदारी (सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) -
कंपन्या ज्या भागांत काम करतात, तेथील कच्चा माल व मनुष्यबळाचा उपयोग करतात. ही संसाधने वापरत असताना, कंपन्यांनी त्यांचा वापर न्याय्य, योग्य व सामाजिकदृष्ट्या जबाबदार पद्धतीने करावा, ही अपेक्षा अगदीच वाजवी आहे. कंपन्यांनी त्यांच्या निव्वळ नफ्याचा दोन टक्के भाग सामाजिक जबाबदारीच्या पूर्ततेसाठी वापरावा, असा आदेश कंपनी कायदा २०१३ मध्ये देण्यात आलेला आहे. 

3) कंपनी प्रशासन (कॉर्पोरेट गव्हर्नन्स) -
कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे व्यवस्थापनाची निष्ठा व प्रामाणिकपणा होय. या अंगामध्ये दीर्घकाळात गुंतवणूकदारांच्या संपदासंचयावर परिणाम करण्याची क्षमता आहे. म्हणूनच, बाजार नियामक यंत्रणा-‘सेबी’ ही संस्था बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांसाठी यासंदर्भात वेळोवेळी नियमने आणत असते.

(लेखक सजग सिक्युरिटीज् प्रा. लि.चे संचालक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com