घर खरेदीपूर्वी प्रत्येकाने बिल्डरला कोणत्या गोष्टी विचारायला हव्या?

home
home

‘रेरा’ अमलात आल्यामुळे बिल्डर आणि प्रोजेक्टबद्दल बरीचशी माहिती सहजपणे ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. तरीदेखील आपण फ्लॅट किंवा शॉप विकत घेण्यापूर्वी थोडी शहानिशा करणे जरुरीचे आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हा आपल्या जीवनातील सर्वांत मोठा निर्णय असतो. योग्य बिल्डरची निवड करण्यापासून मालमत्तेचे मूल्यांकन करण्यापर्यंत, कोणतीही गोष्ट अंतिम करण्यापूर्वी बऱ्याच पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी खरेदी करताना, खरेदीदारास बिल्डरसंबंधी अनेक प्रश्न असतात. कारण, मालमत्ता एक प्रमाणित उत्पादन नाही आणि म्हणूनच, घर खरेदी करण्यापूर्वी आपल्या बिल्डरकडून काही गोष्टींची चौकशी करणे जिकिरीचे ठरते. 

घराच्या खरेदीपूर्वी प्रत्येकाने बिल्डरला विचारल्या पाहिजेत, अशा काही गोष्टी :

 ‘रेरा’ वेबपोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती आणि बिल्डर किंवा त्यांच्या टीमकडून मिळालेली माहिती याची पडताळणी करून पाहावी. यामध्ये तुम्हाला मिळणार ताबा तारीख नक्की पाहा. 

‘रेरा रेजिस्ट्रेशन’ झाले म्हणजे प्रोजेक्ट १०० टक्के ‘क्लिअर टायटल’चा आहे, असा समज असतो. ‘रेरा’ कायद्यामध्ये सुद्धा बऱ्याच पळवाटा आहेत, त्याचा वापर केलेला असू शकतो. त्यामुळे भविष्यात फसवणूक होऊ शकते. यासाठी प्रोजेक्ट मास्टर फाईल एखाद्या जाणकार वकिलांमार्फत नक्की तपासून घ्या.

आजकाल सर्व फ्लॅट पॅकेजच्या नावाखाली विकले जातात. त्याचे विभाजन जाणून घ्या म्हणजे तुम्हाला वाटाघाटी करण्यासाठी मदत होईल आणि अनावश्यक खर्च टळेल.

NEFT नंतर आता RTGS च्या नियमातही बदल; नवी सुविधा फायद्याची

नवा फ्लॅट घेताना ब्रोकरमार्फत घ्या, जेणेकरून ब्रोकरमार्फत तुमच्या प्रश्नांची उत्तरे बिल्डरकडून मिळवू शकता. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ब्रोकर तुम्हाला तुमच्या आवडी आणि गरजेप्रमाणे प्रॉपर्टीज सुचवतील, म्हणजे तुमचा वेळदेखील वाचेल. 

सध्या कोरोनाच्या साथीच्या काळात सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. म्हणजे थ्रीडी टूर, ई-ब्रोशर, वॉकथ्रू आदी. पण अंतिम निर्णय घेण्याआधी एकदा तरी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या जागी जाऊन सर्व गोष्टी तपासणे गरजेचे आहे.

एक जागरूक ग्राहक म्हणून बिल्डरबरोबर तुमचे जे काही संभाषण किंवा वाटाघाटी होतील, त्या एका कागदावर लेखी स्वरूपात टिपून घ्याव्यात म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही. 

माझ्या निरीक्षणानुसार, ७० ते ८० टक्के ग्राहक प्रत्यक्ष बिल्डरला न भेटताच अंतिम निर्णय घेतात. सेल्स टीमसाठी एक विशिष्ट मर्यादा असते. त्याच्याखाली ते डील देऊ शकत नाहीत. पण थेट बिल्डरसोबत भेट घेऊन अजून वाटाघाटी केल्या तर अधिक चांगले डील मिळू शकते.

बऱ्याच वेळा बिल्डर आपला प्रोजेक्ट एखाद्या ब्रोकिंग एजन्सीकडे मार्केटिंगसाठी देतात आणि त्यांना एक मूलभूत किंमत निश्चित करून दिलेली असते. अशा स्थितीत एका तृतीय संस्थेमार्फत व्यवहार केला जात असतो. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही वेळेस विविध आश्वासने दिली जातात. अशावेळी सर्व चर्चा आणि संभाषण ई-मेल किंवा लिखित स्वरूपात घ्यावे, ज्यामध्ये बिल्डरांना अंतर्भूत करावे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ताबा दिल्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये बिल्डर नक्की काय करणार, हे करार करताना पडताळून पाहावे म्हणजे गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट डीड आदी. यामुळे जमीन मालकी हक्काविषयी निश्चितता मिळते. नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात, नाहीतर दिलेल्या सवलती आणि सुविधा वापरण्यासाठी कदाचित पैसे द्यावे लागतील. 

टेरेसचे (गच्ची) हक्क काही बिल्डर राखीव ठेवतात. त्यामुळे भविष्यात होर्डिंग आणि मोबाइल कंपनीचे टॉवर सहन करावे लागतात आणि त्याच्यातून मिळणारे उत्पन्न कायमस्वरुपी बिल्डरला मिळत राहते. त्यामुळे करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी या गोष्टीची पडताळणी जरूर करावी.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बऱ्याच वेळेस बिल्डर प्रोजेक्टमध्ये व्यावसायिक अधिकार राखून ठेवतात, त्यामुळे भविष्यात बाहेरील व्यक्ती तुमच्या प्रोजेक्टमध्ये येऊ शकतो किंवा काही गोष्टींच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात आणि त्यासाठी अधिक पैसे देखील मोजावे लागू शकतात. त्यामुळे असा उल्लेख असल्यास करारामध्ये बदल करून घ्यावेत.

मूलभूत गरजा आणि त्यासाठीचे प्रयोजन नक्की जाणून घ्या. पाणी, वीज, रस्ता आदी गोष्टी रोजच्या दैनंदिन जीवनात अति महत्त्वाच्या आहेत. याबद्दल बिल्डरकडून तोंडी आश्‍वासने दिली गेली असल्यास सुजाण ग्राहक या नात्याने सर्व गोष्टींची शहानिशा करूनच अंतिम निर्णय घ्यावा. 

बिल्डरने प्रोजेक्ट उभा असलेली जमीन कोणत्या स्वरूपात किंवा करारावर घेतली आहे, ते तपासून पाहा. उदा. लाँग लीज (भाडेपट्ट्याने) किंवा विकत स्वरूपात. 

बिल्डर त्याची अपेक्षित किंमत अधिक कर असा उल्लेख करतात. त्याचे विभाजन आणि मूळ किंमत जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता आणि बऱ्यापैकी कर वाचवू शकता. बिल्डरकडून कोणताही अनावश्यक आणि अनपेक्षित कर लादला जाणार नाही, याची काळजी घ्या.

ताबा मिळाल्यानंतर येणारा महिन्याचा मेंटेनन्स किती असेल, याबद्दल नक्की विचारा, कारण गृहकर्ज घेतले असेल तर त्याचा हप्ता आणि मेंटेनन्स मिळून महिन्याच्या खर्चाचे गणित जुळले पाहिजे. 
(लेखक रिअल इस्टेट प्रशिक्षक, वक्ता आणि लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com