esakal | भारतीय शेअर बाजारात पडझड
sakal

बोलून बातमी शोधा

BSE

भारतीय शेअर बाजारात पडझड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : परदेशी शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण आणि एचडीएफसी बँकेचे (Hdfc bank) अपेक्षेनुसार नसलेले तिमाही निकाल यांचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारांमध्ये उमटून दोन्ही शेअर बाजार एक टक्का पडले. सेन्सेक्स पुन्हा 53 हजारांखाली (52,533) गेला. (Fall Indian stock market)

53 हजारांना स्पर्श करून तेथून पुन्हा खाली पडण्याची परंपरा सेन्सेक्सने आजही कायम राखली. गुरुवारी व शुक्रवारी 53 हजारांच्यावर बंद झालेला सेन्सेक्स आज ती पातळी राखू शकला नाही. सेन्सेक्स आज 586 अंश तर निफ्टी (nifty) 171 अंश पडला. दिवसअखेर निफ्टी 15,752 अंशांवर स्थिरावला.

हेही वाचा: रिलायन्स, इंडियन ऑइलची नाशिकमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

अमेरिकी निर्देशांक डाऊ जोन्समध्ये शुक्रवारी 750 अंशांची मोठी घसरण झाल्याने आज सकाळपासून आशियाई शेअरबाजारही दडपणाखाली होते. त्यामुळे भारतीय निर्देशांकही आज व्यवहार सुरु होतानाच घसरले व सेन्सेक्सही 53 हजारांखाली आला. दुपारनंतर निर्देशांक पुन्हा आणखी घसरले. एचडीएफसी बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत घसघशीत नफा (स्टँडअलोन प्रॉफिट 7,729 कोटी रु. 16 टक्के वार्षिक वाढीसह) नोंदविला होता. मात्र तरीही तो बाजारातील तज्ञांच्या अपेक्षेएवढा नसल्याने गुंतवणुकदारांनी या समभागांची व त्यासोबत बहुतेक साऱ्याच बँका आणि वित्तसंस्थांच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस - IMD

एचडीएफसी बँक 50 रुपयांनी घसरून 1,470 रुपयांवर तर एचडीएफसी 54 रुपयांनी घसरून 2,482 रुपयांवर बंद झाला. तर इंडसइंड बँक 28 रुपयांनी घसरला, अॅक्सीस बँकही दोन टक्के घसरला. 137 रुपयांनी घसरलेला मारुतीचा समभाग 7,165 रुपयांवर बंद झाला. बजाज फायनान्स 114 रुपयांनी घसरून 6,012 रुपयांवर स्थिरावला. आज फक्त एनटीपीसी दोन रुपयांनी तर नेस्ले 99 रुपयांनी वाढला. डॉ. रेड्डी व सनफार्मा हे समभाग देखील किरकोळ वाढले. सेन्सेक्समधील प्रमुख 30 समभागांपैकी अन्य सर्व 26 समभागांचे दर आज कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे दर

सोने - 48,040 रु.

चांदी - 67,800 रु.

loading image