esakal | 'या' पाच कारणांमुळे शेअर बाजार कोसळला; तिसरं कारण सगळ्यांत ताजं
sakal

बोलून बातमी शोधा

five reasons sensex and nifty down information marathi

जागतिक बाजारपेठेत आज, सकाळपासून कच्च्या तेलाच्या किमती घसरण्यास सुरुवात झाली.

'या' पाच कारणांमुळे शेअर बाजार कोसळला; तिसरं कारण सगळ्यांत ताजं

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम आज, भारतीय शेअर बाजारात दिसला. मुंबई शेअर निर्देशांक आणि निफ्टीमध्ये ऐतिहासिक घसरण पहायला मिळाली. मुंबई शेअर निर्देशांकात गेल्या दोन महिन्यांत सातत्यानं घसरण होत आहे. पण, आजची घसरण ऐतिहासिक आहे. या घसरणीमागे पाच महत्त्वाची कारणं आहेत. जाणून घेऊया ही कारणे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अर्थिक क्षेत्रातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) कच्या तेलाच्या किमती घसरल्या
जागतिक बाजारपेठेत आज, सकाळपासून कच्च्या तेलाच्या किमती घसरण्यास सुरुवात झाली. किमतींमध्ये एक-दोन नव्हे तर 30 टक्क्यांनी घसरण झालीय. पेट्रोलियम पदार्थ निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेच्या इतिहासात आखाती देशातील युद्धानंतरची ही सर्वांत मोठी घसरण आहे. मुळात भारतीय बाजारात तेलाच्या किमती जास्त असणेही परवडत नाही आणि त्या मोठ्या प्रमाणावर घसरणेही परवडत नाही. त्यामुळं त्याचा परिणाम थेट बाजारात दिसतो. आज, रिलायन्स इंडस्ट्रिज् आणि ओएनजीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज 12 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

2) कोरोनाचा दणका
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना आता केवळ चीन पूरता मर्यादित राहिलेला नाही. तर, त्याने बहुतांश देशांमध्ये शिरकाव केलाय. अगदी पश्चिम आशियात सौदी अरेबियामध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळं रियाधमध्ये शाळा, कॉलेजना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जगात सध्या एक लाख 7 हजार जणांना त्याची लागण झाली असून, चीनमधील मृतांचा आकडा 3 हजारांच्यावर गेलाय. गेल्या 24 तासांत इटलीत 130 जणांचा मृत्यू झालाय. या सगळ्याचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर होताना दिसत आहे. त्यात भारताची बााजरपेठही चुकलेली नाही. 

आणखी वाचा - राणा कपूर कुटुंबाच्या 20 बनावट कंपन्या, येस बँकेतून व्यवहार 

3) अनिश्चिततेचं सावट
देशात येस बँक या बड्या खासगी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने बाजारात अस्थिरतेचं वातावरण आहे. यापूर्वी पीएमसी बँक आणि आता येस बँक यांमुळं एकूणच आर्थिक पातळीवर अस्थिरतेचं वातावरण दिसत आहे. त्यामुळं गुंतवणूकदारही घाबरले आहेत. येस बँकेच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण पहायला मिळाला होती. आज, येस बँकेचा शेअर थोडा सावरला असला तरी, बाजारात त्यामुळं अस्वस्थता आहे. रेटिंग एजन्सी इक्राने बँकेचे रेटिंग कमी केल्यानंतर या अस्थितरतेला सुरुवात झाली. रिझर्व्ह बँकेने निर्बंध टाकल्यानंतर त्यावर येस बँक क्राईसिसवर शिक्कामोर्तब झाले. 

4)विदेशी गुंतवणूकदारांची पाठ
विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेण्याला सुरुवात केली आहे. या गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारातील शेअर्सची होत असलेली विक्री थांबण्याचे नाव घेत नाहीय. गेल्या 15 सत्रांमध्ये असेच चित्र असल्यामुळं बाजारावर परिणाम होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 21 हजार 937 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 24 फेब्रुवारीपासून विदेशी गुंतवणूकदार रोज शेअर्सची विक्री करू लागले आहेत. 

अर्थिक क्षेत्रातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

5) जागतिक बाजाराचा परिणाम
जागतिक बाजारात आज, सकाळपासून मोठी घसरण पहायला मिळाली. जपानचा बाजार 5.2 टक्क्यांनी तर, ऑस्ट्रेलियाचा बाजार 6.4 टक्क्यांनी घसरला. जपानाच्या बाजारातील 2015नंतरची ही सगळ्यांत मोठी घसरण आहे. भारतीय बाजारापूर्वी हे बाजार सुरू होतात. त्यामुळं तेथील घडामोडींवर भारतातील बाजाराची उलाढाल अवलंबून राहते. परिणामी आज भारतात बाजार खुला होतानाच सुमारे 1100 अंशांची घसरण झाली होती. गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यास सुरुवात केली होती.