१० हजार रुपये पगार ते अब्जाधीश, Paytm च्या विजय शेखर शर्मा यांची प्रेरणादायी गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vijay sharma

मोबाइल रिचार्ज कंपनी ते Paytm, अब्जाधीश विजय शेखर शर्मा यांची गोष्ट

मुंबई: आयपीओच्या माध्यमातून Paytm ने आज शेअर बाजारात पदार्पण केलं. यावेळी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) भावूक झाले होते. पेटीएम ही भारतातील पहिल्या पिढीची स्टार्टअप कंपनी आहे. १० हजार रुपये वेतनापासून सुरु झालेला विजय शेखर शर्मा यांचा उद्योजक बनण्यापर्यंतचा प्रवास खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे. भावी पिढीला प्रेरणा देणारा आहे.

वयाच्या २७ व्या वर्षी विजय शेखर शर्मा हे महिन्याला १० हजार रुपये वेतन घेत होते. त्यावेळी वेतनाचा हा आकडा विवाहाच्या बोहल्यावर चढण्यासाठी पुरेसा नव्हता. "२००४-०५ साली मला माझ्या वडिलांनी कंपनी बंद करुन महिन्याला ३० हजारापर्यंत वेतन मिळणार असेल, ती नोकरी करायला सांगितली" असे विजय शेखर शर्मा यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले.

आज Paytm भारतातील डिजिटल पेमेंटमधील लोकप्रिय कंपनी आहे. याच पेटीएमची शर्मा यांनी २०१० साली स्थापना केली होती. इंजिनिअरगची पदवी घेतलेल्या विजय शेखर शर्मा यांची पेटीएम कंपनी सुरुवातीला मोबाइल रिचार्जचे काम करायची.

विजय शेखर शर्मा यांनी सुरुवातीच्या दिवसाच्या अनुभवाबद्दल सांगितले की, "त्यावेळी लग्नासाठी स्थळ येत होती. पण वेतनाचा १० हजाराचा आकडा ऐकला की, पुन्हा ते संपर्क साधत नव्हते" मागच्याच आठवड्यात शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पेटीएम कंपनीने २.५ अब्ज डॉलर्सचा IPO बाजारात आणला. शिक्षक असलेले पिता आणि गृहिणी असलेल्या आईच्या पोटी विजय शेखर शर्मा यांचा जन्म झाला. ते मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. २०१७ मध्ये शर्मा भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश होते. प्रचंड मेहनतीने संपत्ती, पैसा बनवणाऱ्या विजय शेखर शर्मा यांना आजही रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर चहा प्यायला आवडतो. कधीकधी सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने ते स्वत: दूध आणि ब्रेड आणायला जातात.

हेही वाचा: समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

"आपला मुलगा काय करतोय, याची माझ्या आई-वडिलांना बराचकाळ कल्पना नव्हती" टाइम चायना अँट ग्रुपने सर्वप्रथम पेटीएममध्ये २०१५ मध्ये गुंतवणूक केली. "एकदा माझ्या आईला हिंदी न्यूजपेपर वाचताना माझ्या संपत्तीबद्दल कळलं. त्यावेळी तिने मला पहिल्यांदा विचारलं. खरोखर तुझ्याकडे एवढा पैसा आहे का?" असे विजय शेखर म्हणाले. फोर्ब्सनुसार शर्मा यांची निव्वळ संपत्ती २.४ अब्ज डॉलर आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले सागर बंगल्यावर

पेटीएमचा प्रवास

दशकभरापूर्वी Paytm ची मोबाइल रिचार्ज कंपनी म्हणून सुरुवात झाली होती. खासगी टॅक्सी सेवा देणाऱ्या उबरने डिजिटल पेमेंट सुविधेमध्ये पेटीएमचा समावेश केला आणि कंपनी वेगाने वाढली. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजारांच्या नोटांवर बंदी घातली. त्यावेळी डिजिटल पेमेंटला दिलेले प्रोत्साहन पेटीएमच्या पथ्यावर पडलं.

डिजिटल पेमेंट बरोबरच पेटीएमवरुन सिनेमाचं, विमानाचं तिकिट बुक करता येऊ शकतो. त्याशिवाय अन्य सुविधाही आहेत. भारतात पेटीएमपासून डिजिटल पेमेंटची सुरुवात झाली. पण आता त्यांच्यासमोर गुगल, अमेझॉन, WhatsApp आणि वॉलमार्टच्या फोन पे चं आव्हान आहे.

विजय शेखर शर्मा विवाहित असून त्यांना एक मुलगा आहे. विजय शर्मा यांना कंपनीच्या यशाची पूर्ण खात्री आहे. २०१७ मध्ये पेटीएमने कॅनडात बिल पेमेंट app ची सुरुवात केली. विजय शर्मा यांचं पेटीएमबद्दल खूप मोठं स्वप्न आहे. त्यांना पेटीएमची सेवा सॅन फ्रॅन्सिस्को, न्यू यॉर्क, लंडन, हाँगकाँग आणि टोक्यो या शहरापर्यंत घेऊन जायची आहे.

loading image
go to top