esakal | "भारतीय अर्थव्यवस्था 20 वर्षांत 15 ट्रिलियन डॉलरची होईल"
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Economy

"भारतीय अर्थव्यवस्था 20 वर्षांत 15 ट्रिलियन डॉलरची होईल"

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - जगातील सर्वात मोठ्या आणि सतत वाढत जाणाऱ्या मध्यमवर्गामुळे भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) येत्या चार वर्षांत पाच लाख कोटी डॉलरची होईलच. पण, येत्या वीस वर्षांत 15 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास अदाणी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी भागधारकांना दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी कंपनीच्या प्रगतीचा तसेच कंपनीने केलेल्या समाजसेवेचा आढावाही घेतला. (Gautam Adani Say Indian economy grow 15 trillion in 20 years)

कोविडसारख्या कठीण कालखंडातही 2021 या आर्थिक वर्षातील अदाणीच्या सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित उत्पन्न बत्तीस हजार कोटी रुपये (मागील वर्षापेक्षा 22 टक्के वाढ) इतके होते. बाजार नियमकांच्या काही प्रशासकीय कार्यवाहीबाबत काही माध्यमांच्या वृत्तांकनामुळे अदाणी समूहांच्या समभागात तीव्र चढ-उतार दिसून आले. मात्र, कंपनी म्हणून अशा आव्हानांचा सामना आम्ही करू शकतो, हा आत्मविश्वास आमच्यात कायम राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: एक मायक्रो कॅप कंपनी मोठी भरारी घेण्याच्या तयारीत; बनू शकतो तुफान पैसा

अदाणी पोर्ट्स आणि एसइझेड या कंपनीने या काळात भारतातील बंदरावरून हाताळल्या गेलेल्या मालापैकी पंचवीस टक्के सामानाची हाताळणी केली. कंटेनर विभागात कंपनीचा हिस्सा 41 टक्के इतका राहिला. अदाणी ग्रीन एनर्जी हि कंपनी 2020 मध्ये सौरऊर्जा निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी (25 गिगावॉट क्षमता) बनल्याचेही गौतम अदाणी म्हणाले. अदाणी एंटरप्राइजेस या कंपनीमार्फत समूहाने विमानतळ विकास या क्षेत्रात पाउल ठेवले आहे आणि आता भारतातील प्रत्येक चार प्रवाशांपैकी एक प्रवासी अदाणी विमानतळावरून उड्डाण करतो, असेही त्यांनी दाखवून दिले.

बंदर, विमानतळ, लॉजिस्टिक, नैसर्गिक संसाधने, औष्णिक आणि अपारंपरिक वीज उत्पादन, पारेषण, वितरण, डेटा सेंटर, संरक्षण, बांधकाम, शहरी वायू वितरण आणि इतर अनेक क्षेत्रात आज अदाणी समूह कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात अदाणी फाऊंडेशनच्या कामाचा व्याप अनेक पटीने वाढल्याचे सांगताना गौतम अदाणी यांनी याचे श्रेय आपली पत्नी प्रीती यांना दिले. फाऊंडेशनच्या कामांपैकी सुपोषण प्रकल्पाने तेहतीस हजार बालकांना कुपोषणाच्या गर्तेतून बाहेर काढले व त्यांच्या मातांना सक्षम केले. तर क्रीडा क्षेत्रातील टॅलेंट जोपासण्याच्या गर्व है या उपक्रमातील दहापैकी सात खेळाडू टोकियो ऑलिंपिक मध्ये खेळण्यास पात्र ठरल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले. यात अमित पांघल, राणी रामपाल, दीपक पुनिया, के. टी. इरफान, रवी कुमार, अंकिता रैना आणि शिवपाल सिंग यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Petrol Diesel Price: इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस

दोनदा पृथ्वीप्रदक्षिणा

कोरोनाकाळात अदाणी समूहाने आणि अदाणी फाऊंडेशनने गुजरातमधील आपली दोन रुग्णालयेही पूर्णपणे कोविड रुग्णालये केलीच. पण, अहमदाबादमधील अदाणी विद्या मंदिरचे रुपांतर शेकडो खाटांच्या सुसज्ज रुग्णालयात केले. लॉजिस्टिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लसी देशभर पुरवण्यासाठी जे अंतर कापले ते दोन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्याएवढे होते, असेही अदाणी यांनी नमूद केले.

loading image