Exclusive : सोन्याचा दर 'वाढता वाढता वाढे'; दोन दिवसात 1800 रुपयांनी महागले!

वृत्तसंस्था
Monday, 6 January 2020

युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पहिले जाते. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याला झळाळी प्राप्त झाली आहे.

मुंबई : अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी सोने मागील सात वर्षांच्या उच्चांकीवर पोचले आहे. 10 एप्रिल 2013 नंतर सोन्याचा हा जागतिक बाजारातील आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. तर भारतीय वायदे बाजारात सकाळच्या सत्रात सोने 41 हजार 96 रुपयांपर्यंत वाढले होते. तर दोन दिवसात सोन्यामध्ये तब्बल 1800 रुपयांनी वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अणुकराराच्या मुद्यावरून 2016 पासून पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण या दोन देशांदरम्यान संबंध ताणले गेले आहेत. त्याचीच परिणीती म्हणून शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वाढतच आहे. अमेरिका सातत्याने इराणवर हल्ला करण्याची भाषा करत आहे. तर त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी इराण देखील सज्ज होत आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याने गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला आहे.

- हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ

तर दुसरीकडे अराजकीय अस्थिरतेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र त्याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसत असल्याचे चित्र आहे. देशात लग्नसराईची धूम सुरु असल्याने सोन्याला अगोदरच मागणी आहे. अशावेळी सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे.

- दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान अन् 11 फेब्रुवारीला निकाल

सोन्याच्या मागणीत वाढ का?

युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पहिले जाते. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याला झळाळी प्राप्त झाली आहे. जागतिक कमोडिटी बाजारात स्पॉट गोल्ड 1.4 टक्क्यांनी वाढून 1573 डॉलर प्रति औसवर पोचले आहे. अमेरिकी बाजारात गोल्ड फ्युचर्समध्ये 1.6 टक्क्याची वाढ झाली असून सोन्याचा भाव 1577.80 डॉलर झाला आहे.

- नवीन वर्षात व्हा 'डिजिटल' गुंतवणूकदार!

चांदी देखील वधारली

सोन्याबरोबरच चांदीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. कमोडिटी बाजारात चांदीचा भाव 724 रुपयांनी वधारला असून प्रति किलो 48251 रुपये झाला आहे. तर सकाळच्या सत्रात चांदीने 48660 रुपयांचा उच्चांक गाठला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold price jumped to Rs 1800 per 10 gram in 2 days due to tension between US and Iran