दोन दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण; हजार रुपयांनी झालं स्वस्त

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

गुरुवारीच दिल्लीत सराफ बाजारात सोने 714 रुपयांनी स्वस्त झाले होते. यानंतर सोन्याचा दर 50 हजार 335 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला होता.

नवी दिल्ली - लग्नसराईला आता सुरुवात झाली असून देशात सोन्या चांदीचे दरही कमी जास्त होत आहेत. सोन्याच्या किंमती नियंत्रणात रहाव्या यासाठी सरकारकडून 2 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं सोनं खरेदी करणाऱ्यांना आधार कार्ड आणि पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. यामुळे सोन्याच्या किंमती नियंत्रणात राहतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमती 49 हजार 650 रुपये इतकी होती. 24 कॅरेट सोन्याची किंमत 54 हजार 160 रुपयांवर पोहोचली. तर मुंबईत 22 कॅरेट सोनं 49 हजार 820 रुपये  तर 24 कॅऱेट सोनं 50 हजार 820 रुपये 10 ग्रॅम इतकं झालं आहे.

गुरुवारीच दिल्लीत सराफ बाजारात सोने 714 रुपयांनी स्वस्त झाले होते. यानंतर सोन्याचा दर 50 हजार 335 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला होता. तर चांदीच्या दरातही घसरण झाली होती. गुरुवारी चांदीचा दर 386 रुपयांनी स्वस्त होऊन 69 हजार 708 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला होता. गेल्या दोन दिवसात सोन्याचा दर 1200 रुपयांहून अधिक घसरला आहे. 

हे वाचा - घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; होमलोनसाठी एसबीआयची ऑफर

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर गोल्ड फ्यूचर्स आधीच्या दिवसाच्या तुलनेत 4.10 टक्क्यांनी घसरला यामुळे सोन्याची वायदा किंमत जवळपास 2086 रुपयांनी कमी झाली. तर एमसीएक्सवर चांदीचा दर 6 हजार 100 रुपये म्हणजेच 8.8 टक्के घसरला आहे. यामुळे चांदी 63 हजार 850 रुपये किलो ग्रॅम इतकी झाली होती. 

एमसीएक्स इंडियावर सोन्याच्या दरात घसरण ही आंतरराष्ट्रीय सोन्याच्या घसरणीसह बघायला मिळाली. डॉलर वधारल्यानं जवळपास सोन्याची किंमत 1833.83 डॉलर प्रति औंस इतकी होती. तर डॉलर वधारल्यानं बुलियनवर दबाव पडतो आणि इतर चलनांसाठी महागाई वाढते. 

आता बँकेत जाण्याची गरज नाही, Paytm वर मिळेल 2 मिनिटांत 2 लाखांचे कर्ज

 

अमेरिकेत शुक्रवारी सोन्याचा दर 1900 डॉलरपेक्षा खाली घसरला. सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या पुढच्या साखळीसाठी दर 50 हजार 104 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका निश्चित करण्यात आला आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-21 सिरीज एक्स 11-15 जानेवारी या कालावधीत सुरु राहणार आहे. त्यासाठी सेटलमेंटची तारीख 19 जानेवारी असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rate today silver gold price jweelery market india