सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

सोन्याच्या दरवाढीला गेल्या आठवड्याभरात ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेल्या दरांमुळे सराफ बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

नवी दिल्ली - सोन्याच्या दरवाढीला गेल्या आठवड्याभरात ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेल्या दरांमुळे सराफ बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. बुधवारी दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅममागे 600 रुपयांनी कमी झाली. तर चांदीचे दर किलोपाठीमागे 3 हजार रुपयांनी घटले. तज्ज्ञांच्या मतानुसार, अमेरिकन डॉलरचे दर वधारल्यानं परदेशात सोन्याचे दर कमी झाले आहेत.

मंगळवारी दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याचा दर 1182 रुपयांनी वाढला होता. सोमवारी सोनं प्रति 10 ग्रॅम 53 हजार 674 रुपये  होतं ते मंगळवारी 54 हजार 856 रुपये झालं. मुंबईत हेच दर सोमवारी 53 हजार 894 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. बुधवारी बदललेल्या दरानुसार दिल्लीत सोन्याचा दर 54 हजार 269 रुपये इतका झाला होता.

सोन्याच्या नव्या दरानुसार दिल्लीतील सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 269 तर मुंबईत 53 हजार 424 रुपये इतकी झाली आहे.  तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत एक किलो चांदीचे दर 72 हजार 562 वरून 69 हजार 450 रुपयांवर आले आहेत.  चांदीचे दर 3 हजार 112 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईत चांदीचा दर 67 हजार 135 रुपये प्रति एक किलो इतका आहे. 

हे वाचा - चर्चा चकाकत्या सोन्याची

कोटक सिक्युरिटीजने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. अजुनही दराची स्थिती अशीच राहू शकते. गुंतवणुकदारांचे लक्ष अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या मिनट्सकडे लागून राहिले आहे. बुधवारी रात्री उशिरा मिनट्सची घोषणा होईल. 

हे वाचा - ...म्हणून कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत सोन्याचा भाव वाढतोय

सध्या सर्वत्र सोन्याची चर्चा होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोन्यात आता गुंतवणूक करावी की नाही, हा प्रश्‍न अनेकांना पडत आहे. सोने आधुनिक भाषेत कमॉडिटी असले तरी सोने सर्वकालीन महत्त्वाचे आहे. कारण सोन्याएवढे शाश्वत मूल्य अन्य कोणत्याही गुंतवणूक पर्यायांत नाही. सोने हे चलनाप्रमाणे मूल्यवान आहे. त्यामुळे काळाच्या ओघात गुंतवणुकीचे नवे पर्याय आले असले तरी आधुनिक काळातही जोखीम संरक्षणासाठी सोन्यातील गुंतवणुकीस प्राधान्य दिले जायला हवे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rates today silver price low wednsday