esakal | ...म्हणून कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत सोन्याचा भाव वाढतोय
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus,  India, Gold Prices, Investment, International Commodity Market, liquidity, Gold Rate

कोरोना संकटातही सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. याकाळात सोन्याकडे एक उपयुक्त गुंतवणूक म्हणून पाहण्याचा कल दिसतोय. सध्याच्या काळात इतर मालमत्तांपेक्षा गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदीमध्ये तेजीचे वातावरण दिसून येत आहे.

...म्हणून कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत सोन्याचा भाव वाढतोय

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

आतापर्यंतच्या इतिहासात कठीण जागतिक परिस्थितीत सोनं नेहमी वधारलं आहे. साथीचा रोग आणि भू-राजकीय संकटा दरम्यान सोनं नेहमी महाग झाल्याचे पाहायला मिळाले. यात 80 च्या दशकातील वाढलेला आंतराष्ट्रीय तणाव किंवा अरब युध्दाचा प्रसंग असो. पण कोरोनाच्या संकटजन्य परिस्थिती अगदी उलट परिस्थिती पाहायला मिळते. कोरोना संकटातही सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. याकाळात सोन्याकडे एक उपयुक्त गुंतवणूक म्हणून पाहण्याचा कल दिसतोय. सध्याच्या काळात इतर मालमत्तांपेक्षा गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदीमध्ये तेजीचे वातावरण दिसून येत आहे.  पुढील किमान दीड वर्ष सोन्याचा दर उच्च पातळीवर कायम राहण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.  सध्या सुरू असलेलं व्यापार युद्ध आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या भीतीने सोन्याचा भाव वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले असून पुढील काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने प्रति औंस 2450 डॉलर्स पर्यंत जाईल (म्हणजे प्रति तोळा 65 हजारांपर्यंत) असं अर्थतज्ञांनी सांगितलं आहे. 

सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक? वाचा संभाव्य परिणाम

ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे माजी अध्यक्ष बच्छराज बामलवा म्हणाले की, जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याचे दर सध्या उच्च पातळीवर पोहचले आहेत. सध्या सोन्याची 'भौतिक' मागणीत जरी कमी असली तरी, गुंतवणूकदार त्यांच्या बचतीसाठी आणि गुंतवणूकीसाठी पिवळ्या धातूचा सर्वोत्तम पर्याय शोधत आहेत. बामल्वा पुढे बोलताना म्हणाले, जरी रशियाने कोरोना व्हायरसवर लस तयार केल्याचा दावा केला असला तरी अद्याप जगाला  याबद्दल फारशी खात्री नाही. ज्यावेळेस या लसीबद्दल काही सकारात्मक बातमी येईल तेंव्हा इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक वाढून सोने स्थिर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

म्युच्युअल फंड योजनेची निवड कशी कराल?

तसेच दिल्ली बुलियन अँड ज्वेलर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल यांच्या मते, सध्यस्थिती पाहता पुढील किमान एक वर्ष तरी सोनं उच्च पातळीवर राहील.  तसेच संकटाच्या वेळी गुंतवणूकदारांसाठी सोनं हे वरदान ठरत आलंय. दिवाळीपर्यंत सोन्यात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.  कमॉडिटी विश्लेषक आणि आझाद फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख अमित आझाद यांचे मते यावेळी सोन्याच्या वाढीचे कारण 'हेजिंग' आहे.( व्यवहारात कमीतकमी नुकसान होण्यासाठीची एक योजना असते. ट्रेंडींगमधील आपली पहिली योजना फसली तरीही आपले भांडवल सुखरुप ठेवण्यासाठी केलेली तजवीज म्हणजे हेजिंग होय.) तसेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपर्यंत अमेरिका आणि चीनमधील तणाव कायम राहण्याची शक्यता आहेत .त्यानंतर गोष्टी मिटतील, त्यानंतर सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : अस्थिरतेतही आकर्षण अल्पबचत योजनांचे 

'मिलवूड केन इंटरनॅशनल'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीट भट्ट म्हणाले की, जगातील मध्यवर्ती बँकांनी संकटाच्या वेळी त्यांची अर्थव्यवस्था पुन्हा जिवंत करण्यासाठी व्यवस्थेमध्ये भरपूर तरलता (Liquidity) ठेवली आहे. ते म्हणाले की, मर्यादित तरलता उपलब्ध असल्याने गुंतवणूकदार पिवळ्या धातूमध्ये गुंतवणूक करीत आहेत. सध्याचं व्यापार युद्ध आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या भीतीने सोनं ही एक आकर्षक मालमत्ता बनली आहे.