सर्वसामान्यांसाठी खूशखबर! सरकार आणतंय 'ग्रीन रेशन कार्ड'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

केंद्र सरकारच्या निर्देशावर देशातील राज्य सरकारे गरीब लोकांसाठी ग्रीन रेशनकार्ड योजना आणत आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या निर्देशावर देशातील अनेक राज्य सरकारे गरीब लोकांसाठी ग्रीन रेशनकार्ड (Green Ration Card Scheme) योजना आणत आहे. या योजनेमुळे गरिबांना  एक रुपयात एक किलो अन्नधान्य मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील सरकारे ग्रीन कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभापासून वंचित राहिलेल्या गरिबांना अन्नधान्य पुरवणार आहेत. 

हरियाणा, झारखंडसह अनेक राज्य सरकारांनी या दिशेने तातडीने काम सुरू केले आहे. अनेक राज्य सरकारे या वर्षाच्या अखेरीस किंवा 2021 च्या सुरुवातीला ही योजना राज्यात राबवणार आहेत. झारखंड सरकारने 15 नोव्हेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आतापर्यंत रेशनकार्डपासून वंचित राहिलेल्या गरीब कुटुंबांनाच या योजनेचा फायदा होणार आहे. ग्रीन रेशनकार्डधारकांना यासाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

रिलायन्सची चांदी! अबुधाबीतील कंपनीची 5512 कोटींची गुंतवणूक

अशाप्रकारे अर्ज करू शकाल-
ग्रीन रेशनकार्ड मिळवण्यासाठी रेशनकार्डसारखीच अर्जाची पद्धत असेल. ग्रीन रेशनकार्डसाठी जनसेवा केंद्र, अन्न पुरवठा विभाग किंवा पीडीएस सेंटरवर अर्ज करता येईल. अर्जदारला स्वतः ऑनलाइन अर्जही करू शकता येईल. अर्जदारांना ग्रीन रेशनकार्ड मिळवण्यासाठी विविध प्रकारची माहिती द्यावी लागणार आहे. ग्रीन रेशनकार्डसाठी आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, निवासी आणि मतदार ओळखपत्र देणे अनिवार्य असेल.

ग्रीन रेशनकार्डअंतर्गत राज्य सरकार गरिबांना प्रति व्यक्ती 5 किलोग्रॅम अन्नधान्य देणार आहे. देशातील अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेची सर्व जबाबदारी राज्य सरकारांची असेल. याबद्दल सध्या विविध राज्यात ही योजना कशी प्रभावीपणे राबवता येईल यावर चर्चा सुरु आहे. राज्ये अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ग्रीन कार्ड देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येत आहे.

आरोग्य विमा घेण्यापूर्वी घ्या काळजी;  IRDAIने दिली महत्वाची माहिती

देशभरात राज्य सरकारतर्फे ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेमध्ये बीपीएल कार्डधारकांनाच ग्रीन रेशनकार्ड मिळतील. ही योजना जरी केंद्र सरकारने तयार केली असली तरी त्याच्या अंमलबजावणी काम राज्य सरकारांना करावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेचा फायदा फक्त बीपीएल कार्डधारकांनाच होणार आहे. तसेच बीपीएल कार्डधारक किती गरीब आहेत हे देखील पाहिले जाणार आहे. याबद्दलची बातमी न्यूज 18 ने दिली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green Ration Card Holder get 5 kg of food grains per person