भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा; 2021 पर्यंत देशावर असेल सर्वाधिक कर्ज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

कोरोनाच्या संकटात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताची अर्थव्यवस्थेलासुद्धा यामुळे दणका बसला असून आता जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने धोक्याची घंटाच वाजवली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताची अर्थव्यवस्थेलासुद्धा यामुळे दणका बसला असून आता जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने धोक्याची घंटाच वाजवली आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने मंगळवारी म्हटलं की, 2021 पर्यंत भारत हा सर्वाधिक कर्ज असललेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. कोरोना महामारीमुळे आर्थिक विकास आणि वित्तीय गणितांमध्ये बराच फरक पडणार आहे. याचा अर्थव्यवस्थेवरही प्रभाव पडेल आणि पुढच्या काही वर्षांपर्यंत अशा देशांच्या अर्थव्यवस्थेला कर्जाच्या ओझ्याखालीच रहावं लागेल.

मूडीजने म्हटलं आहे की, विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेत सध्या वाढत असलेल्या तुटीमुळे त्यांच्यावरील कर्जात वाढ होत आहे. 2019 च्या तुलनेत 2021 पर्यंत यात 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. यातील काहींवर मोठं व्याजही भरावं लागणार आहे. ज्यामुळे कर्जात आणखी वाढ होईल. मूडीजने म्हटलं की, विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेत ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यावर सर्वाधिक कर्ज असू शकतं. 

हे वाचा - 'कुणीच कल्पना केली नव्हती अशी गोष्ट आम्ही केली', कोरोना लशीबद्दल ट्रम्प यांची मोठी घोषणा

कमकुवत झालेली अर्थव्यवस्था आणि अचानक ओढावलेलं संकट यामुळे भारत, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि तुर्कस्तान यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. मूडीजने म्हटलं की, भारताच्या अर्थव्यवस्थेवरील वाढत्या दबावामुळे अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये एनपीएमध्ये होणाऱ्या वाढीची समस्या मोठी होत चालली असून बँकाच्या स्थितीवर याचा परिणाम होत आहे. विशेषत: सरकारी बँकांची स्थिती बिकट झाली आहे. 

इतिहासात पहिल्यांदाच जीडीपीमध्ये सर्वाधिक घट
कोरोना विषाणू (Coronavirus) महामारी आणि टाळेबंदीचा प्रभाव सकल राष्ट्रीय उत्पादनावरही (GDP)पाहायला मिळाला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल-जून) भारताच्या जीडीपीमध्ये तब्बल २३.९ टक्क्यांची घसरण नोंद करण्यात आली आहे. या तुलनेत गेल्या तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये ३.१ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. २०१९-२० च्या या काळातील तिमाहीमध्ये ५.२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. सोमवारी सरकारकडून जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. २१ लाख करोड रुपयांच्या आर्थिक मदतीनंतरही कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंदे उद्धवस्त झाले आहेत. तसेच याचा वाईट परिणाम सामान्य लोकांवर पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india will emerging market sovereigns highest debt burdens 2021 moody