आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडे ठेवा लक्ष

‘सेन्सेक्स’, तसेच ‘निफ्टी’ ‘ब्रेक आउट’ देत तेजीचा कल दर्शवत आहे.
सेन्सेक्स
सेन्सेक्सsakal

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६२,८६८ अंशांवर तर ‘निफ्टी’ १८,६९६ अंशांवर बंद झाले. जागतिक पातळीवर नकारात्मक संकेत मिळाल्याने गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने ४१५ अशांची; तर ‘निफ्टी’ने ११६ अंशाची घसरण दर्शविली. जागतिक पातळीवरील भू-राजकीय परीस्थिती, महागाई नियंत्रण आणि आर्थिक विकास दर उंचावण्याचे आव्हान, व्याजदरवाढीचे चक्र अशा प्रतिकूल परिस्थितीतदेखील ‘सेन्सेक्स’ने गेल्या आठवड्यात ६३, ५८३ अंशांचा तर ‘निफ्टी’ने देखील १८,८८७ अंशांचा नवीन उच्चांक गाठला.

मध्यम अवधीच्या आलेखानुसार ऑक्टोबर २०२१ पासून १८,६०४ ते १५,१८३ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढउतार दर्शविल्यानंर प्रतिकूल परिस्थितीमध्येदेखील ‘निफ्टी’ने गेल्या शुक्रवारी १८,६९६ या पातळीला बंद होत मर्यादित पातळ्यांमध्येच चढउतार दर्शविणाऱ्या अवस्थेतून जणू बाहेर डोकावत तेजीचा कल दर्शविला आहे. फंडामेंटल्सचा विचार करता सध्या ‘निफ्टी’ निर्देशांकाचे किंमत उत्पादन गुणोत्तर २२ च्या आसपास आहे, तर मार्केट कॅप टू जीडीपी १०५ टक्क्यांच्या आसपास पोहचला आहे.

ज्याप्रमाणे मध्यम अवधीच्या आलेखानुसार ‘सेन्सेक्स’, तसेच ‘निफ्टी’ ‘ब्रेक आउट’ देत तेजीचा कल दर्शवत आहे. त्याचप्रमाणे ब्रिटानिया इंडस्ट्रीज, एपीएल अपोलो ट्यूब्स या कंपन्यांचे शेअरदेखील तेजीचा कल दर्शवत आहेत. आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्देशांक ‘सीएनएक्स आयटीआयएन’ने जानेवारी २०२२ पासून जून २०२२ पर्यंत पडझड दर्शविली. पडझडींनंतर जवळपास पाच महिने ३०,५५९ ते २६,१८६ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढउतार दर्शविल्यानंतर ‘सीएनएक्स आयटीआयएन’ निर्देशांकांने ३१,०५२ अंशावर बंद भाव देत आलेखानुसार तेजीचा कल दर्शविला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी टीसीएस, टेक महिंद्रा, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (एलटीटीएस) आदी आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडे लक्ष ठेवणे फायदेशीर ठरू शकेल.

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस

(एलटीटीएस) गुंतवणूक संधी

(शुक्रवारचा बंद भाव रु.४,२८७)

‘एलटीटीएस’ अर्थात एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ही एक अभियांत्रिकी सेवा प्रदाता कंपनी आहे, जी परिवहन, औद्योगिक उत्पादने, दूरसंचार आणि हाय-टेक, वैद्यकीय उपकरणे यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांना अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास आणि डिजिटलायझेशन सोल्यूशन्स ऑफर करते. कंपनीच्या ग्राहक वर्गामध्ये ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यामधील जवळपास ६९ कंपन्या आहेत. ऑटो, टेलिकॉम, प्रक्रिया उद्योग, पॉवर युटिलिटी आदी विविध उद्योग विभागांमध्ये उपस्थिती असल्याने व्यवसाय वृद्धीतील धोक्याचे परिणामकारक व्यवस्थापन करून कंपनी विकास आणि डिजिटलायझेशन सोल्यूशन्सचे उपाय ग्राहकाच्या मागण्या लक्षात घेऊन क्रॉस सेलिंग करत उद्योगात प्रगती करण्यास सक्षम आहे.

वाढत्या महागाई किंवा मंदावलेल्या जागतिक वाढीच्या परिस्थितीमध्ये जगभरातील ‘कॉस्ट ऑप्टिमायझेशन ड्राइव्ह’मुळे (खर्च नियंत्रण) संरचनात्मक दृष्टिकोनातून भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी सेवा हा तुलनेने तरुण उद्योग असताना, आकडेवारीनुसार असे लक्षात येते, की भारतीय आयटी क्षेत्रातील यूएस/युरोपमधील मंद वाढीचा आउटसोर्सिंगवर मर्यादित प्रभाव पडतो. ‘एलटीटीएस’ कंपनीने कर्जाचे प्रमाण अत्यंत कमी ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने २५ टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसाय वृद्धी केली आहे.

सध्या आलेखानुसार ३,९४२ रुपये या अडथळा पातळीवर ४,२८७ रुपयांवर बंद भाव देऊन या कंपनीच्या शेअरने तेजीचा कल दर्शविला आहे. शेअरच्या दरामध्ये होणाऱ्या चढउताराचा धोका लक्षात घेऊन दीर्घावधीच्या दृष्टीने या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com