'भारतात 'जीओ'मुळचं डेटा झाला स्वस्त'

टीम ई-सकाळ
Monday, 24 February 2020

"फ्युचर डिकोडेड सीईओ समिट'मध्ये मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी संवाद साधला.

मुंबई  : भारत जगातील अग्रगण्य डिजिटल समाज बनण्याच्या मार्गावर असून, देशाची अर्थव्यवस्था जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. भारतात डेटा स्वस्त होण्यात जीओ अर्थात रिलायन्स उद्योग समूहाचं मोठं योगदान आहे, असा दावाही अंबानी यांनी केलाय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशक्य ते शक्य झालं रिलायन्समुळं 
"फ्युचर डिकोडेड सीईओ समिट'मध्ये मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी संवाद साधला. या वेळी अंबानी म्हणाले, 'भारतातील या मोठ्या बदलांमध्ये वेगवान मोबाईल नेटवर्कच्या प्रसाराचा महत्त्वाचा वाटा आहे. पंतप्रधानांनी आम्हाला 2014 मध्ये डिजिटल भारताचे स्वप्न दाखविले, तेव्हाच याची सुरुवात झाली. जिओच्या 4 जी तंत्रज्ञानाकडे 38 कोटी नागरिक वळले आहेत. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. फक्त हे पाच वर्षांत होते की दहा वर्षांत, एवढेच पाहावे लागेल. आपले बालपण ज्या वातावरणात गेले, त्यापेक्षा अगदी वेगळा भारत पुढील पिढीला दिसेल.' भारतात एक जीबी डेटासाठी 300 ते 500 रुपये द्यावे लागत होते. हा डेटा 12 ते 14 रुपये जीबी इतका स्वस्त करण्यात रिलायन्स उद्योग समूहाचा खूप मोठा वाटा असल्याचा दावा मुकेश अंबानी यांनी यावेळी सत्या नडेला यांच्या उपस्थितीत केला. 

आणखी वाचा - कोरोनाचा परिणाम सोन्याच्या दरांवर; वाचा सविस्तर बातमी

आणखी वाचा - अर्थविषयक घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

नडेला भारत दौऱ्यावर 
रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर क्‍लाउड तंत्रज्ञानासंदर्भात मायक्रोसॉफ्टने केलेल्या भागीदारीचा उल्लेख, सत्या नडेला यांनी या वेळी केला. मायक्रोसॉफ्टने 2019 मध्ये रिलायन्सबरोबर 10 वर्षांचा करार केला आहे. रिलायन्सच्या डेटा सेंटरना तंत्रज्ञानाचे पाठबळ देण्यासंदर्भातील हा करार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला हे भारतीय वंशाचे असून, सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या तीन दिवसांत ते दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूत विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jio reduced data charges down india mukesh ambani to satya nadella