esakal | कोणत्या शेअर्सची निवड करणे योग्य?
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

कोणत्या शेअर्सची निवड करणे योग्य?

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,३८६ अंशांवर, तसेच ‘निफ्टी’ १५,६८९ अंशांवर बंद झाला. येत्या आठवड्यात आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, विप्रो, एल अँड टी इन्फोटेक, टाटा एलेक्सी आदी अनेक कंपन्यांचे निकाल जाहीर होतील. यामुळे आगामी काळात या कंपन्यांच्या शेअरमध्ये चंचलता; तसेच हालचालींचे प्रमाण वाढणे स्वाभाविक असेल.

आलेखानुसार तीन प्रकारचे शेअर असतात. पहिला प्रकार म्हणजे वर जाणाऱ्या जिन्यासारखी वाटचाल करीत असलेले अर्थात तेजीचा कल दर्शविणारे शेअर. दुसरा प्रकार म्हणजे उतरणाऱ्या जिन्यासारखी वाटचाल करीत असलेले म्हणजेच मंदीचा कल दाखविणारे शेअर आणि तिसरा प्रकार म्हणजे मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार करीत असलेले शेअर.

अल्पावधीसाठी; तसेच मध्यम अवधीसाठी ‘ट्रेडिंग’ करताना तेजीचा व्यवहार करण्यासाठी, तेजीची वाटचाल करीत असलेल्या; तसेच मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर या अवस्थेमधून तेजीच्या अवस्थेत प्रवेश करणाऱ्या म्हणजेच आलेखानुसार ‘ब्रेकआऊट’ देणाऱ्या शेअरची निवड करणे फायदेशीर ठरू शकते.

तेजीचा कल दर्शविणारे शेअर कधीही मंदीचा कल दर्शविणाऱ्या अवस्थेत प्रवेश करू शकतात. यामुळे ‘ट्रेडिंग’ करताना एकाच कंपनीच्या शेअरची निवड करण्यापेक्षा तेजीचे संकेत देणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मर्यादितच जोखीम स्वीकारून आवश्यकतेनुसार ‘स्टॉपलॉस’चा वापर करीत ‘ट्रेड’ करणे योग्य ठरू शकते.

ब्रोकिंग कंपन्यांकडे लक्ष

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात ब्रोकिंगशी निगडित सेवा देणाऱ्या एंजल ब्रोकिंग, आयआयएफएल सिक्युरिटीज, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस, ५ पैसा कॅपिटल, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस आदी अनेक कंपन्यांच्या शेअरनी भाववाढ दर्शविली आहे. २४ मे २०२१ रोजी मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरचा भाव रु. ८४८ असताना तेजीचे संकेत देत असल्याचे सूचित केले होते. आता या शेअरचा भाव रु. ९८६ झाला आहे. गेल्या आठवड्यात शेअरमधील उलाढालीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मध्यम अवधीच्या आलेखानुसार जुलै २०१८ पासून मागील तीन वर्षे मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर रु. ९४८ या ‘रेजिस्टन्स’ अर्थात अडथळा पातळीच्या वर रु. ९८६ ला बंद भाव देऊन या शेअरने मध्यम अवधीसाठी तेजीचा कल दर्शविला आहे. आलेखानुसार जोपर्यंत या कंपनीचा शेअर बंद भाव तत्वावर रु. ७५९ या आधार किंवा ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत चढ-उतार करीत आणखी भाववाढ होऊ शकते.

बर्जर पेंट्समध्ये तेजीचा कल

गेल्या आठवड्यात पेंट्स क्षेत्रातील दिग्गज बर्जर पेंट्स या कंपनीच्या शेअरने आलेखानुसार तेजीची वाटचाल केली आहे. मागील १० वर्षांत या कंपनीने विक्री; तसेच नफ्यात वार्षिक तत्वावर अनुक्रमे १० आणि १५ टक्के वाढ नोंदविली आहे. गेल्या १० वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी या शेअरचा भाव रु. ५५२ असताना आलेखानुसार तेजीचे संकेत देत असल्याचे नमूद केले होते. आता या शेअरचा भाव रु. ८४४ झाला आहे. जानेवारी २०२१ पासून मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. ८४४ ला बंद भाव देत या शेअरने मध्यम अवधीसाठी तेजीचा कल दर्शविला आहे. आलेखानुसार जोपर्यंत भाव रु. ६७४ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आणखी भाववाढ होऊ शकेल.

हेही वाचा: ‘मेरे पास सेन्सेक्स है...!’

येत्या आठवड्यात निर्देशांकाने; तसेच तेजीचा कल दाखविणाऱ्या शेअरनी तेजीचा कल दर्शविल्यास मर्यादित भांडवलावर मर्यादितच जोखीम स्वीकारून तेजीचे व्यवहार करणे योग्य ठरू शकेल.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

हेही वाचा: चर्चा ‘झोमॅटो’च्या ‘आयपीओ’ची!

loading image