esakal | बाजारपेठेने झटकली मरगळ, दिवाळीत औरंगाबाद जिल्‍ह्यात सुमारे एक हजार कोटींची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

0diwali123_0

कोरोनामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याने बाजारपेठेला मरगळ आली होती. मात्र, दसऱ्यापासून बाजारपेठेने मोठी उसळी घेतली. दिवाळी तर बाजारपेठेसाठी बंपर राहिली. घरात बंदिस्त असलेल्या लोकांनी या दिवाळीत भरभरून खरेदी केली.

बाजारपेठेने झटकली मरगळ, दिवाळीत औरंगाबाद जिल्‍ह्यात सुमारे एक हजार कोटींची उलाढाल

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याने बाजारपेठेला मरगळ आली होती. मात्र, दसऱ्यापासून बाजारपेठेने मोठी उसळी घेतली. दिवाळी तर बाजारपेठेसाठी बंपर राहिली. घरात बंदिस्त असलेल्या लोकांनी या दिवाळीत भरभरून खरेदी केली. यामुळे दसरा-दिवाळीत जिल्‍ह्यातील बाजारपेठेत एक ते दीड हजार कोटींची उलाढाल झाल्याचे व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितले. दिवाळीत ऑटोमोबाईल, बांधकाम क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, सोने-चांदी मार्केट, कपडा मार्केटमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. व्यापाऱ्यांनी भरघोस सवलती जाहीर केल्या होत्या; तसेच वाहन बाजारातही वाहनकंपन्यांनी दिलेल्या सवलतीचा फायदा ग्राहकांनी घेतला. निराला बाजार, पैठणगेट, गुलमंडी, कुंभारवाडा परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती.

कोविड चाचणी नाही तर शिक्षकांना शाळेत 'एन्ट्री' नाही 

कपडा मार्केटमध्ये कोट्यवधींची उलाढाल
दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत नवीन कपडे खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. सहा महिन्यांनंतर सुरू झालेल्या कापड दुकानांमध्ये अभूतपूर्व गर्दी झाली. रेडिमेडला सर्वाधिक पसंती मिळाली. जिल्ह्यातील कपडा मार्केटमध्येही कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. दसऱ्याला दोन ते तीन कोटी तर दिवाळीत ३० कोटींपर्यंत उलाढाल झाली, असे व्यापारी भरत शहा यांनी सांगितले.

चारचाकी अन् दुचाकी
दसऱ्याला पाचशे चारचाकी, तर दिवाळीत लक्ष्मीपूजन, पाडव्याच्या दिवशी जवळपास आठशे चारचाकींची विक्री झाली. तर दसरा आणि दिवाळी मिळून पाच हजारहून अधिक दुचाकींची विक्री झाली. ऑटोमोबाईल क्षेत्रात जवळपास दोनशे ते अडीशचे कोटींची उलाढाल झाली आहेत. यंदाची दिवाळी वाहन मार्केटसाठी बंपर राहिली. यातील शंभर ते दोनशे जणांना दिवाळीत बुकिंग करूनही चारचाकी वाहन मिळाले नाही. त्यांना अजूनही एक ते दोन आठवडे वाट पाहावी लागणार आहे, असे ऑटोमोबाईल महासंघाचे अध्यक्ष राहुल पगारिया यांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘एम.फिल’ प्रवेशासाठी उद्या ‘सीईटी’

सराफा बाजाराला शंभर कोटीची ‘झळाळी’
प्रतितोळा ६० हजारपर्यंत मजल मारलेल्या सोने-चांदीच्या दरातील चढ-उतार होत रहिला. दसऱ्यानंतर ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांनी मोकळ्या मनाने खरेदी केली. ग्राहकांच्या या उदंड प्रतिसादामुळे दसरा, दिवाळी-पाडवा दोन्ही मुहूर्तावर सुमारे १०० कोटींची उलाढाल झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये १०० कोटींची उलाढाल
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी यंदाच्या दिवाळीत तिहेरी ऑफर्स जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा ग्राहकांनी घेत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. एसी, एलईडी टी.व्ही. वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यासह सर्व उपकरणे खरेदीसाठी दसरा-दिवाळीत मोठी गर्दी झाली होती. या बाजारपेठेत शंभर कोटीहून अधिकची उलाढाल झाल्याचे इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांनी सांगितले. यासह फर्निरचर व इतर घरगुती उपकरणासाठी ५० ते १०० कोटींची उलाढाल झाली.तीनशेहून अधिक गृहप्रवेश
दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश शुभ मानला जातो. दसऱ्याला शंभर तर दिवाळीत दोनशे गृहप्रवेश झाले आहेत. यासह तीनशेहून अधिक नवीन घरांची बुकिंग क्रेडाईच्या सदस्यांकडे करण्यात आली आहे. यातून दसरा आणि दिवाळी मिळून तीनशे ते चारशे कोटींची उलाढाल बांधकाम क्षेत्रात झाली असल्याचे क्रेडाईतर्फे सांगण्यात आले.

Edited - Ganesh Pitekar

loading image