Maruti Sales Rise: नोव्हेंबरमध्ये 'मारुती'च्या विक्रीत 1.7 टक्क्यांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

कॉम्पॅक्ट श्रेणीतील स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायरच्या विक्रीत 1.8 टक्क्यांनी घट झाली आहे.

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये 1.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने 1,53,223 कारची विक्री केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 1,50,630 कार विकल्या होत्या. मारुती सुझुकीने मंगळवारी निवेदन जारी करुन ही माहिती दिली. नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत बाजारातील विक्रीत किरकोळ वाढ होऊन ती 1,44,219 पर्यंत पोहोचली. नोव्हेंबर 2019 मध्ये देशांतर्गत बाजारात 1,43,686 कार विकल्या होत्या. कंपनीची मिनी कार, अल्टो आणि एस-प्रेसोची विक्री 15.1 टक्क्यांनी घटून 22,339 पर्यंत आली. गेल्या वर्षी याच महिन्यात 26,306 कारची विक्री झाली होती. 

कॉम्पॅक्ट श्रेणीतील स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायरच्या विक्रीत 1.8 टक्क्यांनी घट झाली आहे. या श्रेणीतील 76.630 कारची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 78,013 कारची विक्री झाली होती. मध्यम आकाराची सेदान कार सियाझची विक्री 29.1 टक्क्यांनी वाढून 1,870 वर पोहोचली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये 1448 कारची विक्री झाली होती. 

हेही वाचा- 'व्याख्याच स्पष्ट नसलेला 'लव्ह जिहाद'वरील कायदा मानवी स्वातंत्र्याविरोधात'

याच पद्धतीने यूटिलिटी वाहन व्हिटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि एर्टिगाची विक्री 2.4 टक्क्यांनी वाढून 27,753 पर्यंत पोहोचली आहे. जी गेल्यावर्षी याच महिन्यात 23,204 झाली होती. नोव्हेंबरमध्ये कंपनीची निर्यात 29.7 टक्क्यांनी वाढून 9,004 वर पोहोचली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये कंपनीने 6,944 वाहनांची निर्यात केली होती. 

हेही वाचा- 'अन्नदाता धरणे देतोय आणि 'असत्य' टिव्हीवर भाषण'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maruti suzuki cars sales up 1 7 percent in November