'कोरोनाविषाणूच्या संकटा'तून घ्यावयाचे पैशाचे धडे...

Money-lessons
Money-lessons

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सर्वच जगावर संकट आले आहे. या कालावधीत फक्त जागतिक अर्थकारणच छवळून निघाले नाही तर प्रत्येक नागरिकाच्या पर्सनल फायनान्सकडे बघण्याच्या दृष्टीकोनावरही परिणाम झाला आहे. आगामी भविष्यात वैयक्तिक आर्थिक व्यवहार आणि पैशाशी संबंधित बाबी हाताळण्याच्या आणि त्याकडे बघण्याच्या सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनात मोठा बदल होणार आहे. आर्थिक बाबीसंदर्भात ते अधिक जबाबदार आणि सावध होतील. सद्यस्थितीचा काहींना अजूनही फटका बसला नसेल तर त्यांनी आताच सावध होण्याची आवश्यकता आहे. यातून धडा घेण्याची गरज आहे. भविष्यातील विपरित परिस्थितीसाठी तयार असणे केव्हाही चांगले.

योग्य नियोजन करून घेतलेले निर्णय तुम्हाला संकटकाळात सावरतील किंवा तुमचे कमीत कमी आर्थिक नुकसान होईल. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकट काळातून आपण का१ही धडे घेऊ शकतो, ते असे...

१. भविष्यातील उत्पन्नाची खात्री कधीही बाळगू नका
२. योग्य आर्थिक नियोजनासाठी इमर्जन्सी निधी अत्यावश्यक 
३. कर्ज घेताना खूप काळजीपूर्वक घ्या. ही एक दुधारी तरवार आहे.
४. विमा ही अत्यावश्यक बाब आहे
५. कमी खर्चात तुमचे आयुष्य चालू शकते आणि तुम्ही अधिक बचत करू शकता
६. इक्विटीत गुंतवणूक करताना चढउतार लक्षात घ्या
७. डोळे बंद करून डेट फंडात गुंतवणूक करू नका

१. भविष्यातील उत्पन्नाची खात्री कधीही बाळगू नका
भविष्यासाठीचे आर्थिक नियोजन करताना बहुसंख्य नागरिक सध्याचे त्यांचे उत्पन्न कोणताही अडथळा न येता भविष्यातही सुरू राहील आणि त्यात वाढ होत राहील असे गृहित धरतात.

मात्र अडथळे किंवा संकटे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मग ते वैयक्तिक स्वरुपातील संकट असो किंवा जागतिक पातळीवरील १९९९ मधील डॉटकॉम फुगा फुटणे, २००८ मधील अमेरिकेतील सबप्राईम संकट असो कि सध्याचे कोरोना विषाणू महामारीचे संकट असो. अशा आर्थिक संकटांमुळे व्यवसाय बंद पडतात, नोकऱ्या जातात. त्यामुळेच भविष्यातील उत्पन्न गृहित धरू नये. विशेषत: व्यवसाय आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्या याबाबतची असुरक्षितता मोठी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण हे सर्व गृहित धरतो की आयुष्य हे सुखकारक असेल आणि इथे कायमच प्रगती होत राहील. परंतु प्रत्यक्षात वास्तविक आयुष्य हे चढ उतारांनी भरलेले असते. हे सर्व लक्षात घेऊन आपण यापुढच्या काळात तरी पुरेशा रोकडची तरतूद केली पाहिजे, इमर्जन्सी निधीची तरतूद केली पाहिजे. या बाबी तुमच्या आर्थिक नियोजनाचा अविभाज्य भाग असल्या पाहिजेत.

२. योग्य आर्थिक नियोजनासाठी इमर्जन्सी निधी अत्यावश्यक 
पुरेशा इमर्जन्सी फंडाची किंवा आपत्कालीन निधीची तरतूद नसल्यास सद्य परिस्थितीसारख्या संकटात आपले आर्थिक नियोजन कोलमडणार हे निश्चित आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाची व्याप्ती किती असणार हे आपल्याला माहित नाही. अशी संकटे नेमकी कधी येणार याचीही आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे पुरेशी रोकड किंवा आपत्कालीन निधीची तरतूद आपण अशा अभूतपूर्व संकटांचा सामना करण्यासाठी केलेली असणे महत्त्वाचे आहे. अशा संकटांकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण काही रक्कम बाजूला काढून ठेवणे गरजेचेच आहे.

जर तुम्ही अशा आपत्कालीन निधीची तरतूद आधीच केलेली नसली तर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीतून पैसे काढावे लागतात किंवा वेळप्रसंगी कर्ज घ्यावे लागते.  त्याचा परिणाम तुमच्या भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांवर होणार हे नक्की. त्यामुळेच जर तुमच्याकडे आपत्कालीन निधी असेल तर तुम्ही या संकटाला अधिक चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकाल. मात्र तुम्ही आतापर्यत आपत्कालीन निधीची तरतूद केली नसेल तर लवकरात लवकर अशी तरतूद करण्याला प्राधान्य द्या. किमानआपल्या ६ महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम आपत्तकालीन निधीमध्ये असली पाहिजे. 

३. कर्ज घेताना खूप काळजीपूर्वक घ्या. ही एक दुधारी तरवार आहे.
तुम्ही जितके अधिक कर्ज घेतले असेल तितके त्याचे नियोजन करणे सद्यस्थितीत संकटात अवघड होऊन बसते. कोणीही अशा संकटाची कल्पना केली नव्हती. या संकटकाळात अत्यंत सुरक्षित अशी उत्पन्नाची साधनेसुद्धा असुरक्षित झाली आहेत. तुमची जर मोठ्या प्रमाणावर कर्जे घेतली असतील तर वेळेवर कर्जाच्या हफ्त्यांची परतफेड करणे तुम्हाला अवघड होईल आणि त्यासाठी तुम्हाला अधिक व्याजदराचे आणखी कर्ज घ्यावे लागेल आणि मग तुम्ही एका सापळ्यात अडकण्याची शक्यता आहे. 

तुमच्या ईएमआयची रक्कम तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये. तुम्ही जर मर्यादित प्रमाणातच कर्ज घेत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअरसुद्धा चांगला राहतो आणि अशा कठीण काळात तुमचे वित्तीय नियोजन करण्यात ही बाब तुमच्या पथ्यावरसुद्धा पडते. 

४. विमा ही अत्यावश्यक बाब आहे
आयुर्विमा

तुम्ही जर पुरेसे आयुर्विमा संरक्षण घेतलेले नसेल तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला खूप मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळेच योग्य रकमेचा आयुर्विमा असणे ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. विशेषत: सद्यस्थितीतील संकटकाळात कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसंदर्भात त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येते. त्यातही जितक्या लवकरच आयुर्विमा पॉलिसी घेतली तितकाच विम्याचा हफ्ता कमी असतो. कारण विम्याच्या हफ्त्याची रक्कम ही वयावर अवलंबून असते. 

आरोग्यविमा
दिवसेंदिवस आरोग्य विषयक आणि वैद्यकीय खर्च महाग होत असल्यामुळे तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आरोग्यविमा ही एक अत्यावश्यक बाब बनली आहे. अचानक निर्माण झालेला वैद्यकीय खर्च तुमची कित्येंक वर्षांची बचत संपवू शकतो. त्यातच कोरोना महामारीच्या संकटकाळात तर आरोग्यविम्याचे महत्त्व आणखीच अधोरेखित होते आहे. त्यामुळे तुम्ही जर आरोग्यविमा घेतला असेल तर नियमितपणे त्याचे हफ्ते भरत राहा आणि जर आतापर्यत आरोग्यविमा घेतला नसेल तर लवकरात तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आरोग्यविमा घ्या. 

५. कमी खर्चात तुमचे आयुष्य चालू शकते
दर महिन्याचा आर्थिक ताळेबंद हा आपल्यासमोरील डोकेदुखीचा विषय असतो. बहुतांश लोकांची ही तक्रार असते की त्यांचा दर महिन्याचा खर्च इतका आहे की त्यांना बचत करणे शक्यच नाही. मात्र लॉकडाऊन काळात आपण सर्व फक्त अत्यावश्यक बाबींवर खर्च करतो आहोत आणि इतर खर्चाशिवाय आपले आयुष्यही सुरू आहे. वाईटातून चांगले निघते असे म्हणतात त्याचा प्रत्यय इथे आपल्या सर्वांनाच येतो आहे. कोरोनो विषाणूच्या या लॉकडाऊनमुळे आपल्या खर्चातील अत्यावश्यक आणि अनावश्यक बाबींचे वर्गीकरण करण्याची अनोखी संधी आपल्याला मिळाली आहे. आपण या संधीचा पुरेपुर लाभ घेतला पाहिजे. या लॉकडाऊनने आपल्याला दाखवून दिले आहे की एरवी आपण आवश्यक समजत असलेले बरेचसे खर्च हे अनावश्यकच असतात. आपण त्यांच्याशिवायही जगू शकतो.

आपण आपले अनावश्यक खर्च टाळण्यास शिकले पाहिजे. आपल्या खर्चाला प्राधान्यक्रम देण्यास शिकले पाहिजे. अत्यावश्यक खर्च वगळता बाकीचे खर्च करण्याची गरज आहे का ? हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. कारण अनावश्यक खर्च टाळले तरच आपल्याला बचत करता येईल आणि त्यात बचतीतून भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी गुंतवणूक करता येईल. त्या गुंतवणूकीचा परतावाच आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणेल.

६.  चढउतार हा इक्विटीचा गुणधर्म, गुंतवणूक करताना लक्षात घ्या
जेव्हा शेअर बाजारात दीर्घकालावधीसाठी तेजी असते तेव्हा अनेक नवीन गुंतवणूकदार बाजाराकडे आकृष्ट होतात. बहुतांश गुंतवणूकदारांना असेच वाटते की बाजारातील तेजी अशीच कायम राहील. मात्र इक्विटी हा गुंतवणूकदार प्रकार जोखमीचा असतो आणि त्यात अस्थिरताही मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय इक्विटी गुंतवणूक प्रकारात ठराविक कालावधीनंतर मोठी घसरण येत असते. जे गुंतवणूकदार या प्रकारची अस्थिरता आणि घसरण अनुभवतात ते अनुभवातून हुशार होत जातात. मात्र जे गुंतवणूकदार पहिल्यांदाच अशा प्रकारची घसरण किंवा अस्थिरता अनुभवतात ते चिंताग्रस्त होतात किंवा भीतीने ग्रासून जातात. 

इक्विटी प्रकारातील ३० ते ४० टक्क्यांच्या घसरणीसाठी गुंतवणूकदारांनी तयार असले पाहिजे. याशिवाय गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमधील इक्विटी प्रकारातील गुंतवणूकीचे योग्य संतुलन साधले पाहिजे. सर्वात मोठे इक्विटी हा गुंतवणूक प्रकार दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी आहे. ज्यांचे आर्थिक उद्दिष्ट अल्पकालीन आहे अशा गुंतवणूकदारांनी इक्विटी प्रकारात छोट्या कालावधीसाठी गुंतवणूक करू नये. कारण शेअर बाजार ३ ते ५ वर्षांच्या कालावधीत आपली घसरण भरून काढत असतो. मात्र अशा वेळी गुंतवणूकदारांनी संयम ठेवत दीर्घकालावधीसाठीच या प्रकारात गुंतवणूक करणेच योग्य ठरते.

७. डोळे बंद करून डेट फंडात गुंतवणूक करू नका
डेट फंड हे पूर्णपणे सुरक्षित असतात हा गैरसमज अनेक गुंतवणूकदारांमध्ये असतो. इक्विटी फंडांच्या तुलनेत डेट फंड नक्कीच कमी जोखमीचे असतात. त्यात तुलनात्मकरित्या कमी अस्थिरता असते. मात्र तरीही डेट फंडातदेखील एक मर्यादित जोखीम असतेच. कारण डेट फंड ज्या बॉंडमध्ये किंवा कमर्शियल पेपरमध्ये गुंतवणूक करतात तेदेखील बाजाराशी जोडलेले असतात. अर्थव्यवस्थेतील विविध चक्रांचा त्यांच्यावरही परिणाम होत असतो.  

याशिवाय डेट फंड विविध मूल्यांकन असलेल्या बॉंड आणि कमर्शियल पेपरमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यामुळे ज्या डेट फंडाची गुंतवणूक एएए सारखे मूल्यांकन असते त्याच डेट फंडात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरते. असे फंड बाजारातील अस्थिरता आणि जोखीमाचा सामना जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com