'आता कोणतेही कारण नको; जीएसटीसाठी सज्ज व्हा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सांगत आहोत की जीएसटीच्या अंमलबजावणीची तारीख 1 जुलै असेल. यामुळे एखाद्याची तयारी नसण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्याची तयारी झाली नाही याचा अर्थ त्याला ही तयारी करायचीच नाही याची मला भीती वाटते...

नवी दिल्ली: लहान व्यवसायांना वस्तू व सेवा कर(जीएसटी) प्रणालीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे, असे सूचक वक्तव्य करीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व कंपन्यांना जीएसटीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीत सुरुवातीला काही अडथळे निर्माण होतील. पण ही प्रक्रिया वाटते तेवढी किचकट नाही. उद्योगांना या करप्रणालीसाठी स्वतःला तयार करावंच लागेल, असे प्रतिपादन जेटली यांनी केले. सर्व व्यावसायिकांना कारवाईचा अप्रत्यक्ष इशारा देत जेटली म्हणाले की, "गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सांगत आहोत की जीएसटीच्या अंमलबजावणीची तारीख 1 जुलै असेल. यामुळे एखाद्याची तयारी नसण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्याची तयारी झाली नाही याचा अर्थ त्याला ही तयारी करायचीच नाही याची मला भीती वाटते."

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील मानला जात असलेला वस्तु व सेवा कर (जीएसटी) कायदा 30 जूनच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येईल, अशी घोषणा जेटली यांनी आज केली. 30 जून व 1 जुलैमधील मध्यरात्री संसदेमधील सेंट्रल हॉल येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या कायद्याच्या अंमलबजावणीची औपचारिक प्रक्रिया सुरु केली जाईल.

"या व्यवस्थेंतर्गत करचुकवेगिरी रोखण्याच्या अधिक सक्षम यंत्रणेमुळे महसूल वाढेल; आणि केंद्र व राज्य सरकारांची निधी खर्च करण्याची क्षमता वाढेल. यामुळे सकल आर्थिक उत्पन्न वृद्धिंगत होण्यासही अर्थात मदत होईल,'' असे जीएसटीच्या अंमलबजावणीचे ठाम समर्थन करताना जेटली यांनी स्पष्ट केले.

जीएसटीच्या अंमलबजावणीदरम्यान प्राथमिक टप्प्यात होणाऱ्या चुकांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली होती. त्यावर नरमाईचे सूतोवाच करताना अर्थमंत्री जेटली यांनी करविवरणपत्र दाखल करण्यासाठी पहिल्या दोन महिन्यांपर्यंत सवलत मिळेल, असे सांगितले होते. यानुसार ही व्यवस्था लागू झाल्यानंतरच्या पहिले दोन महिने करविवरणपत्र भरण्यात सवलत मिळणार आहे. सप्टेंबरपासून विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक असेल.

'जीएसटी' अंतर्गत प्रत्येक व्यापाऱ्याला महिन्यातून एकदा मुख्य विवरणपत्र आणि कर भरावा लागेल. कुठल्याही वस्तू किंवा सेवावर जो कर भरायचा आहे, त्यावर त्या वस्तूची खरेदी अथवा सेवा देताना जो कर भरला आहे, त्याचे 'इनपुट टॅक्‍स क्रेडिट' आपोआप मिळेल. विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. आपण आपला सर्व हिशेब "जीएसटी' नेटवर्कद्वारा निर्मित एक्‍सेल शीटमध्ये ठेवला, तर महिन्याला ती सर्व माहिती ऑफलाइन टुलद्वारे आपल्या विवरणपत्रात परिवर्तित होईल.

Web Title: no excuses for GST now